Pune : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासन कटीबद्ध – अमित देशमुख

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – मराठी भाषा, कला, संस्कृती, चित्रपट, नाट्य यांच्या संवर्धनासाठी शासन कटीबद्ध असून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून आलेल्या सूचना शासनाकडून स्वीकारल्या जातील, असे मत वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केले.

बालगंधर्व रंगमंदिर येथे महाराष्ट्र शासन व पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे फिल्म फाऊंडेशचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, दिग्दर्शक बी.पी. सिंग, अभिनेते सुबोध भावे, मोहन आगाशे, शिवाजी साटम, अभिजीत श्रीवास्तव, अभिनेत्री मुक्ता बर्वे, पुणे फिल्म फाऊंडेशचे सचिव रवी गुप्ता, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प संचालक नंदिनी आवडे आदी उपस्थित होते.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 18 वर्ष पूर्ण होत आहेत, ही आनंदाची बाब असल्याचे सांगून देशमुख म्हणाले, महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा जोपासण्याचे मोठे कार्य या माध्यमातून होत आहे. मराठी चित्रपटाच्या महोत्सवाचे परीक्षण करण्यासाठी विदेशातून परीक्षक या महोत्सवामध्ये सहभागी झाले ही गौरवास्पद बाब आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून येणाऱ्या सर्व संकल्पांना गती देण्याचे काम सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे फिल्म फाऊंडेशचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल प्रास्ताविक करताना म्हणाले, महाराष्ट्र शासन व पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या वतीने आज पासून 16 जानेवारीपर्यंत चित्रपट महोत्सव रंगणार आहे. महाराष्ट्र हे राज्य सांस्कृतिकदृष्ट्या अग्रेसर राज्य आहे. याबरोबरच राज्यात चित्रपट सृष्टीमध्ये गौरवास्पद कामगिरी झालेली आहे. राज्यात चित्रपट सृष्टी मोठ्या प्रमाणत विस्तारली असून राज्याच्या सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन या चित्रपट महोत्सवातून घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारतीय चित्रपट सृष्टीसाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल अनेक हिंदी मालिकेचे दिग्दर्शक असलेल्या बी.पी.सिंग आणि अभिनेते विक्रम गोखले यांचा विशेष पुरस्कार प्रदान करुन गौरव करण्यात आला. तर ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांचाही सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. श्रीमती खन्ना यांचा सन्मान त्यांच्या कुटुंबियांनी स्वीकारला. या महोत्सवासाठी 60 देशांमधून प्राप्त झालेले निवडक 191 चित्रपट पाहण्याची संधी चित्रपट रसिकांना मिळणार आहे. महोत्सवासाठी विदेशातून आलेल्या परीक्षकांचाही देशमुख यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. यावेळी अनेक चित्रपट रसिक, कलाकार,महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.