Nanoli Tarfe Chakan News : ग्रामीण भागातील सुरक्षित वाहतुकीबाबत प्रशासन उदासीन; स्थानिकांचा जलमार्गे धोकादायक प्रवास सुरूच

एमपीसी न्यूज (श्याम मालपोटे) – विकासाच्या नवीन संकल्पना राबवत शहर, ग्रामीण भागांत योग्य त्या गरजांची काळजी घेत सगळ्यांसाठी संधीचे दार कसे उघडेल यावर प्रशासनाचे प्रामुख्याने लक्ष असते, परंतु ‘नाणोली तर्फे चाकण’ गाव हे यामध्ये अपवाद ठरले आहे. नाणोली (Nanoli Tarfe Chakan) गाव अद्याप सुरक्षित वाहतुकीपासून वंचित राहिले असून अजूनही ग्रामस्थ अत्यंत जोखीम पत्करून जलमार्गे प्रवास करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विकासाच्या नावाने गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी मात्र या विषयी डोळे झाकून बसलेत की काय, असा यक्षप्रश्न स्थानिकांपुढे उभा राहिला आहे,

नाणोली तर्फे चाकण गाव (Nanoli Tarfe Chakan) तळेगाव मुख्य शहरापासून हाकेच्या अंतरावर वसलेल्या तालुक्यांतील मुख्य गावांपैकी एक आहे. नाणोली ग्रामस्थांसाठी मुख्य बाजारपेठ व विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी तळेगाव शहर सोईस्कर ठरते. तळेगाव पर्यंत पोहचण्यासाठी ग्रामस्थ आजही वराळे गावमार्गे जाण्यासाठी इंद्रायणी नदीतील होडीचा चा वापर करत आहेत. या मार्गावर अजूनही पुलाची व्यवस्था नाही त्यामुळे ग्रामस्थ अत्यंत जोखीम पत्करून हा प्रवास वर्षानुवर्षे करीत आहेत.

MLA Sunil Shelke : वैष्णवांच्या मेळाव्याला भाजपच्या मेळाव्याचे रूप देण्यामागचे मास्टरमाइंड देवेंद्र फडणवीस

दरम्यान, नाणोली गावाला तळेगाव एमआयडीसी क्षेत्र लागूनच असले तरी ग्रामीण अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. तळेगाव शहर हे व्यापार व शिक्षणासाठी नजिक असल्याने ग्रामस्थांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. नाणोलीतून तळेगावमध्ये जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. एमआयडीसी मार्गे कातवी-तळेगाव, इंदोरी मार्गे तळेगाव व तिसरा अत्यंत धोकादायक इंद्रायणीनदीतील होडीमधून वराळे मार्गे तळेगाव. पहिले दोन्ही रस्ते गावापासून 10 ते 12 किमी लांब तळेगाव शहराला जोडलेले असून तुलनेत ‘होडी’ द्वारे प्रवास फक्त 4 किमी इतकाच आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थी वेळ व पैशांची बचत व्हावी म्हणून या जलमार्गाचा सर्रास वापर करताना दिसतात.

वेळेची बचत होते या विचाराने जलमार्गाचा धोकादायक प्रवास पत्करून प्रवास करणाऱ्यांची सदर ठिकाणी पूल होईल या आशेवर कित्येक वर्षे गेली, परंतु इतकी वर्षे प्रशासन उदासीनच राहिले. सध्या ज्या नावेतून ग्रामस्थ प्रवास करीत आहेत तिची डागडुजी व्यवस्थित होत नाही, अशी खंत सुद्धा नागरिक व्यक्त करीत आहेत. योग्य ती डागडुजी न झाल्याने पाणी नावेत शिरून अपघात होण्याची शक्यता आहे, तरीही जीवाची बाजी लावत नागरिक या नावेतून प्रवास करीत आहेत. या आधी जिल्हापरिषद सदस्य नितीन मराठे व बाबुराव वायकर यांनी ‘नाव’ उपलब्ध करून दिली होती.

नाणोली (Nanoli Tarfe Chakan) गावातील बहुतांश विद्यार्थी हे तळेगाव येथे उच्च शिक्षणासाठी येतात, परंतु वाहतुकीची व्यवस्था नसल्याने सगळ्यांनाच शिक्षण घेणे सोयीचे ठरतेच असे नाही, त्यामुळे काहीजण केवळ वाहतुकीची योग्य व्यवस्था नसल्याने शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. दरम्यान, तात्काळ पर्यायी व्यवस्था झाली नाही तर शिक्षणापासून वंचित राहणाऱ्यांची संख्या वाढेल म्हणून लवकरच आंबी येथील पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

मावळ मध्ये अनेक ठिकाणी लाखो करोडो रुपये खर्च करत पूल व नवीन रस्ते उभे राहत आहे,परंतु अजूनही ग्रामीण भागातील वाहतुकीची व्यवस्था दयनीय स्थितीत आहे हे धक्कादायक वास्तव आहे. डिजिटल युगात व तळेगाव एमआयडीसीसारख्या परिसरात असे चित्र दिसणे लज्जास्पद आहे, असे मत गावातील तरुण विजय लोंढे यांनी व्यक्त केले आहे.

या ठिकाणी त्वरीत उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी प्रशासनाला व राज्य सरकारला ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.