Pimpri : अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मितीबाबत सरकार सपशेल अपयशी – पृथ्वीराज चव्हाण

एमपीसी न्यूज – अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मितीबाबत सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. तसेच देशात सुरू असलेल्या गंभीर वातावरणाबाबत सरकार उपाययोजना करणार का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

पिंपरी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष सचिन साठे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय बालगुडे, महाराष्ट्र प्रदेश अनूसूचित जाती काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष, गौतम आरकडे, माजी महापौर कविचंद भाट, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मयूर जैसवाल, शिवराज मोरे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे तसेच सुंदर कांबळे, विशाल कसबे, मकरध्वज यादव, अनिरूद्ध कांबळे, शीतल कोतवाल आदी उपस्थित होते.

भाजप सरकारने पाच वर्षात केलेले दावे आणि घोषणा फोल ठरल्याचे सांगताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “पुण्यामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती झाली आहे, असे मागील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. परंतु देवेंद्र फडणवीस निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुणेकरांची दिशाभूल करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली माहिती आणि मी स्वतः माहिती अधिकारात मिळवलेली माहिती यामध्ये तफावत आहे. मुख्यमंत्री आणि रोजगार मंत्री यांनी ‘फॉक्सकॉन कंपनी 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून आयफोनचे उत्पादन सुरू करणार. तसेच जनरल मोटर्स गुजरातमधील प्रकल्प बंद करून पुण्याजवळ 6 हजार 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार’ अशी जाहिरात केली होती. त्याबाबत मुख्यमंत्री माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

इंडस्ट्रियल मॅग्नेट आणि डेट्रॉईट ऑफ ईस्ट अशी ओळख असलेल्या पुणे आणि आसपासच्या भागात मागील चार वर्षात केवळ 1 हजार 898 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 36 हजारांची रोजगार निर्मिती, हे अपयश मुख्यमंत्री आकर्षण म्हणून मिरवत असतील तर उर्वरित राज्यातील गुंतवणुकीची आणि रोजगार निर्मितीची काय परिस्थिती असेल ? असा सवाल देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.

सरकारच्या अपयशाचा पाढा वाचताना चव्हाण म्हणाले, लाखोंच्या संख्येने रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने मागील चार वर्षात पुण्यामध्ये केवळ 20 हजार लोकांना रोजगार दिला. देशाच्या आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्र मागील चार वर्षात आठव्या स्थानावरून 13 व्या स्थानावर गेला आहे. ऑटो सेक्टरमधील साडेतीन लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. सरकारने योग्य पावले टाकले नाहीत, तर दहा लाख लोकांच्या नोकऱ्या जाण्याची भीती आहे. त्यात पुणे अग्रस्थानी आहे.

मोदी सरकारमधील जबाबदार व्यक्ती त्यांचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी बेजबाबदार वक्तव्य करतात. मागील काही दिवसात 267 कार शोरूम बंद पडले. जीएसटीच्या चुकीच्या हट्टीपणामुळे देशाचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. मोदी सरकारच्या काळात रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार 73 हजार कोटींचे घोटाळे झाले. या घोटाळ्यांचे आश्रयदाते कोण, याचीही माहिती देण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. मोदी सरकारच्या काळात उद्योगपती बँका लुटून मोठे झाले. एवढ्या प्रचंड प्रमाणात झालेल्या घोटाळ्यामुळे बँकांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. दोन कमकुवत बँकांना एकत्र करणे म्हणजे बँकिंग क्षेत्र मजबूत करणे, असे होत नाही. मागील सहा तिमाही पासून आर्थिक विकास घसरत आहे. सध्या आर्थिक विकास केवळ पाच टक्के एवढाच आहे. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

भाजप सरकारकडून विकासाबाबतचे आकडे अडीच टक्क्यांनी फुगवून सांगितले जातात. सध्या देशाचा विकासदर पाच टक्के एवढा आहे. त्यात भाजपने अडीच टक्के फुगवून सांगितले असल्याने हा विकास दर अडीच टक्के एवढाच असल्याची शक्यता आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.