Chikhali News : बनावट ओळखपत्राद्वारे एसीपी असल्याची बतावणी करून पोलिसांना हुल

टोल नाक्यावर टोल न भरता शासनाची फसवणूक

एमपीसी न्यूज – सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवून एका बहाद्दराने थेट वाहतूक पोलिसाला हूल दिली. तसेच त्याने टोल नाक्यावर बनावट ओळखपत्र दाखवून टोल न भरता प्रवास केला. हा प्रकार मंगळवारी (दि. 2) सायंकाळी जाधव सरकार चौक, स्पाईन रोड, चिखली येथे घडला.

प्रवीण लक्ष्मण सूर्यवंशी (वय 33, रा. मल्हारपेठ, ता. कराड, जि. सातारा) असे बनावट ओळखपत्र बाळगणा-या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाहतूक पोलीस सुनील गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड हे निगडी वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. ते मंगळवारी सायंकाळी स्पाईन रोड चिखली येथे जाधव सरकार चौकात कर्तव्य बजावत होते. वाहतुकीचे नियम न पाळणा-या तसेच विनामास्क वाहन चालकांवर कारवाई करत होते.

सायंकाळी साडेपाच वाजता होंडा झॅज कार (एम एच 50 / एल 2216) मधून आरोपी प्रवीण सूर्यवंशी आला. तो स्वतः अंधेरी वेस्ट, मुंबई येथे सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असल्याची त्याने फिर्यादी यांना बतावणी केली. तसेच त्याने त्याचे बनावट ओळखपत्र दाखवले. तेच ओळखपत्र टोल नाक्यावर दाखवून त्याने शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत भारतीय दंड विधान कलम 468, 471, 420, 170, 171 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.