Pune News : सेना-भाजप लवकरच विकासाच्या अजेंड्यावर एकत्र येतील – राज्यपाल

एमपीसी न्यूज – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये नेहमीच वादाची पार्श्वभूमी राहिली आहे. याच पार्श्वभूमीदरम्यान राज्यपालांची शिवसेना उपनेत्यांनी भेट घेतली आहे. भारतीय कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस आणि शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना ‘शिवसेना – अस्मिता, संघर्ष, वाटचाल’ हे पुस्तक भेट दिले.

दोघांमध्ये तीस मिनिटे विविध विषयांवर दीर्घ चर्चा झाली. शिवसेना पक्षप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या करिष्म्याचा सेना-भाजप युतीला गेल्या दोन दशकात कसा फायदा झाला, यासह शिवसेनेची कामगार चळवळ व त्याचा आजवर विविध क्षेत्रांना झालेला फायदा यावर चर्चा केली.

दरम्यान, ‘आज ना उद्या सेना-भाजप लवकरच विकासाच्या अजेंड्यावर एकत्र येतील’ याबद्दल राज्यपालांनी विश्वास व्यक्त केला. यावेळी प्रफुल सारडा आणि राहुल बोहरा उपस्थित होते.

डॉ. कुचिक हे महाराष्ट्राच्या किमान वेतन धोरण सल्लागार समितीचे अध्यक्ष असल्याने राज्यपालांना किमान वेतन धोरण,नवीन यंत्रणा आणि अंमलबजावणीबद्दल समजावून सांगितले. असंघटित तसेच आयटी क्षेत्रातील विविध अडचणी त्यांच्यापुढे मांडल्या. त्याचबरोबर कोरोना काळ मजूर वर्गासाठी किती कठीण होता, हे देखील यानिमित्ताने अधोरेखित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.