Pimpri News: ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या प्रदेश अध्यक्षपदी गोविंद घोळवे यांची फेरनियुक्ती

एमपीसी न्यूज – ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांची फेरनियुक्ति करण्यात आली आहे.

पुण्यात झालेल्या कार्यक्रमात ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांच्या हस्ते घोळवे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे आदी उपस्थित होते.

गोविंद घोळवे हे सकाळ माध्यम समूहाचे माजी राजकीय संपादक आहेत. गेली २५ वर्षे ते पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. दैनिक पुढारीमध्ये ते १८ वर्षे कार्यरत होते. घोळवे हे श्री क्षेत्र भगवानगडाचे गेली १७ वर्षे सचिव म्हणून कार्यरत आहेत.

तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तीन वेळा अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कामकाज सांभाळले आहे. देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासमवेत घोळवे हे सन २०१२ मध्ये रशिया दौऱ्यावर गेले होते.

घोळवे यांचा महाराष्ट्रातील राजकारण, अर्थकारण, समाजकारण, अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये दांडगा संपर्क आहे. अत्यंत स्पष्टवक्ते, सडेतोड व्यक्तीमत्व म्हणून त्यांना पत्रकारितेमध्ये ओळखले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.