Gram Panchayat Election Results : काही क्षणांवर ग्रामपंचायतीचा निकाल

एमपीसी न्यूज : आजचा दिवस राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतीच्या निवडणुका शुक्रवारी पार पडल्या. यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ७९ टक्के मतदान झाले. तर काही ठिकाणच्या ग्रामपंचायतीत बिनविरोधी निवडणूक पार पडली आहे.

त्यामुळे आज एकूण २ लाख १४ हजार उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. म्हणूनच सध्या गावागावात काय निकाल लागणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राज्यातील आदर्श गाव राळेगणसिद्धी, हिवरे बाजार आणि औरंगाबाद मधील पाटोद्यामध्ये ३० वर्षानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. त्यामुळे या ठिकाणी काय निकाल लागणार? तसेच जे दिग्गज नेते आहे तिथे कोण निवडून येणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. १४ हजार २३४ एकूण ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. बिनविरोध निवडणूक १ हजार ५२३ ग्रामपंचायतींची पार पडली. तर २६ हजार १७८ उमेदवार बिनविरोधी निवडून आले. ४६ हजार ९२१ एकूण प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली.

दरम्यान पक्षीय पातळीवरील किंवा पक्षांच्या चिन्हांवर ही ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही. तरी देखील आपला पाय मजबूत करण्यासाठी राजकीय नेत्यांना ग्रामपंचायत निवडणुका खूप महत्त्वाच्या असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.