Bavdhan News : बॅनर काढले म्हणून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – ग्रामविकास अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी  बावधन  ग्रामपंचायत परिसरात लावलेले बॅनर काढले. त्यामध्ये एका व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त लावलेला बॅनर देखील कर्मचाऱ्यांनी काढला. त्यावरून पाच जणांनी मिळून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 16) रात्री बावधन बुद्रुक येथे घडली.

विकी राजू मारवाडी कुंभार (वय 30, रा. बावधन) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंदार अर्जुन घुले, महेश अर्जुन घुले, वैभव हरिश्‍चंद्र पडवळ, शैलेश मधुकर घुले, रंजीत गुंजकर उर्फ  गुड्ड्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मंदार आणि महेश या दोघांना अटक केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बावधन ग्रामपंचायत येथे सुपरवायझर म्हणून काम करतात. शुक्रवारी बावधान ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांनी फिर्यादी यांना ग्रामपंचायतीच्या हद्दीत लावलेले   वाढदिवसानिमित्त तसेच इतर फलक काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार फिर्यादी आणि ग्रामपंचायतीचे इतर कर्मचारी यांनी फलक काढले. त्यामध्ये भकाजी कॉर्नर, बावधन येथे आरोपी मंदार घुले याच्या वाढदिवसानिमित्त लावलेला बॅनर देखील फिर्यादी यांनी काढला.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर आरोपी मंदार घुले याने फिर्यादी यांना फोनवरून शिवीगाळ केली. तसेच शुक्रवारी रात्री घुले स्क्वेअर येथे भेट नाहीतर बघ, अशी धमकी दिली. त्यावरून फिर्यादी आणि ग्रामपंचायतीचे अन्य कर्मचारी आरोपी मंदार याला भेटण्यासाठी गेले. तिथे आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या अन्य कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केली. फिर्यादी आणि त्यांचे अन्य कर्मचारी करत असलेल्या सरकारी कामात आरोपींनी अडथळा निर्माण केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.