Grampanchayat Election : ग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी मतदारांना सुट्टी द्या- राज्य शासनाचा आदेश

सुट्टीअभावी मतदान करता आल्याची तक्रार आल्यास कठोर कारवाई

0
_MPC_DIR_MPU_IV

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यात दोन टप्प्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. ग्रामीण भागातील अनेक मतदार कामानिमित्त राज्याच्या विविध भागात वास्तव्यास आहेत. त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्यातील सर्व आस्थापनांनी मतदारांना एक दिवसाची सुट्टी अथवा दोन तासांचा वेळ द्यावा, असे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून याबाबतचा आदेश देण्यात आला आहे.

राज्यात दोन टप्प्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोली, गडचिरोली, धानोरा या भागातील निवडणुकांसाठी देखील 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.

तर 20 जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा या भागातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते. काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये काही संस्था, आस्थापना मतदार नागरिकांना भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागत असल्याचे दिसून आले आहे.

हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये 100 टक्के मतदान होण्यासाठी राज्यातील सर्व आस्थापनांनी नागरिकांना पगारी सुट्टी अथवा वेळेची सवलत द्यावी, असे राज्य शासनाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

राज्य शासनाचा आदेश 

# निवडणूक होणा-या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/ कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणा-या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

# सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल (उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स)

# अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल, मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल.

# कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहिल.

# वर नमूद केल्यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी/व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी.

# मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, संबंधितांविरोधात योग्य कारवाई करण्यात येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.