Nigdi : मिस इंडिया ग्रॅंड विजेती शिवानी जाधवचे प्राधिकरण येथे ग्रॅंड स्वागत

एमपीसी न्यूज – रविवारची सकाळ, प्राधिकरणातील भेळ चौकातील एका कोप-यात लोकांची गर्दी जमलेली, नटून थटून जमलेल्या महिला, कॉलेजकन्यका, छोट्या मुलींच्या नजरेत औत्सुक्य, ती कधी येणार , भेटणार याची सगळ्यांनाच लागलेली उत्सुकता, येणा-या प्रत्येक गाडीकडे लोकांच्या खिळलेल्या नजरा. अखेरीस एक गाडी तिथे येऊन थांबते, दार उघडले जाते आणि आतून बाहेर पडते ती फिक्या क्रीम कलरचा ड्रेस घातलेली, डोक्यावर रत्नजडित दिमाखदार मुकूट घातलेली एक रुपगर्विता, जी मिस इंडिया स्पर्धेमधील एका किताबाची विजेती असते. आणि ती मूळची  प्राधिकरणातील रहिवासी असल्याने आज पहिल्यांदाच ही स्पर्धा संपल्यानंतर आपल्या घरी आपल्या आई, वडिलांना, भावाला, नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना, शेजा-यांना भेटायला येणार असते. नुकत्याच झालेल्या यंदाच्या फेमिना कलर्स मिस इंडिया ग्रॅंड या किताबाची विजेती ठरलेली शिवानी जाधव स्पर्धा संपल्यानंतर आज पहिल्यांदाच आपल्या घरी आली. घरच्यांनी , मित्रमैत्रिणींनी, आप्त, परिचितांनी तिचे तुतारी, ताशाच्या गजरात जोरात स्वागत केले तेव्हा शिवानी देखील काहीशी भावुक झाली. कारण संपूर्ण जगाने कितीही कौतुक केले तरी आपल्या लोकांकडून पाठीवर पडलेली छोटीशी थापदेखील खूप मोलाची असते.

मूळची प्राधिकरणातील रहिवासी असलेली शिवानी नोकरीनिमित्त छत्तीसगड येथील रायपूर येथे वास्तव्यास होती. यंदाच्या मिस इंडिया स्पर्धेत तिने तिथूनच भाग घेतला. त्यात ती छत्तीसगड राज्याची विजेती ठरली. त्यामुळे तिला मिस इंडिया स्पर्धेत उतरता आले आणि या स्पर्धेत तिने मिस इंडिया ग्रॅंडचा किताब पटकावला. तसेच बॉडी ब्युटिफुल या किताबाची देखील ती मानकरी ठरली. प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेची माजी विद्यार्थिनी असलेल्या शिवानीने इंजिनिअरिंगची पदवी पुण्यातील एमआयटीमधून पटकावली. त्यानंतर ती नोकरीसाठी रायपूर येथे होती. त्याआधी कॉलेजमध्ये असताना ती कॉलेज प्रिन्सेस या किताबाची मानकरी ठरली होती. त्यामुळे शिवानीने नंतर मिस दिवा या सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला. तिथे ती दहावी आली. पण त्या स्पर्धेनंतर शिवानीला या स्पर्धांची गोडी लागली. म्हणून तिने मिस इंडिया स्पर्धासाठी तयारी करण्याचे ठरवले. त्यानुसार रायपूरमधून १३२ स्पर्धकांमधून निवड होऊन ती कलकत्ता येथे दाखल झाली. तिथे ती फायनल राऊंडची विजेती होऊन स्टेट विनर ठरली.

त्यानंतर मग मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियममध्ये १५ जून रोजी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात अंतिम तीस स्पर्धकांमधून मिस इंडिया ग्रॅंड या स्पर्धेची विजेती ठरली. आणि मिस छत्तीसगड स्पर्धेपासून सुरु झालेल्या मागील सहा ते सात महिन्यांच्या अथक परिश्रमांचे जणूकाही चीज झाले. अर्थात या स्पर्धेदरम्यान अनेक कसोटीचे क्षण आले, घरातल्यांपासून दूर रहावे लागले. खाण्यापिण्याचे निर्बंध सांभाळावे लागले, मित्रमैत्रिणींना भेटता नाही आले. पण या सा-या गोष्टी विसरायला लावणारा तो लखलखता मुकुट अखेर डोक्यावर चढला. आता शिवानीला यापुढील जागतिक स्पर्धेसाठी म्हणजे मिस इंडिया ग्रॅंडसाठी येत्या ऑक्टोबर महिन्यात व्हेनेझुएलाला जायचे आहे. त्या स्पर्धेसाठी आई, वडिल,आप्तस्वकीयांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज ती खास आली होती. तिचे यापुढील तीन दिवस देखील खूप गडबडीचे जाणार आहेत. उद्या ती तिच्या शाळेला सदिच्छा भेट देणार आहे. त्यानंतर ती साता-याजवळील मर्ढे या तिच्या मूळ गावी जाणार आहे.

वडील जीवन जाधव, आई नयना जाधव, भाऊ संकेत जाधव या चौकोनी कुटुंबातील शिवानी आज भारताचे  सौंदर्यस्पर्धेत प्रतिनिधित्व करत आहे, पण तिला आपल्या आईची हातची खिचडी आजही प्रचंड प्रिय आहे. शुद्ध शाकाहारी असलेल्या शिवानीला महाराष्ट्रीयन जेवणाचीच आवड आहे. आईच्या हातची पुरणपोळी, खिचडी, भेंडीची भाजी हे तिचे आवडीचे खाद्यपदार्थ आहेत. आणि या सौंदर्यस्पर्धेसाठी बाहेर राहावे लागल्याने ती ते मिस करते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.