Grandparents day : राज्यातील सर्व शाळांमध्ये आजी-आजोबा दिवस होणार साजरा, शासनाचा जीआर जारी

एमपीसी न्यूज : राज्यातील सर्व शाळांमध्ये आता आजी आजोबा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने एक जीआर सुद्धा काढला आहे. सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी आजोबांवर असते. त्यामुळे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या (Grandparents day) रविवारी आजी-आजोबा दिवस साजरा केला जातो. हाच आजी आजोबा दिवस शाळेत साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी आजोबांचे प्रेम नातवंडांना मिळत नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
शाळेतील अनुभवासह आजी आजोबांचे अनुभव त्यांच्या हितगुजातून मिळणारी माहिती या गोष्टी पाल्यांच्या जडण घडणीसाठी पोषक ठरतात. त्यामुळे शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून आजी आजोबांना शाळेत आमंत्रित करून मुलांशी संवाद, खेळ व गप्पा गोष्टी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ओळख करणे यासाठी “आजी आजोबा” दिवस शाळेत साजरा करणे संस्कारपूर्णतेच्या दृष्टीने गरजेचे आहे.
Baramati : बारामतीमधील बावधन परिसराची पालिका अधिकाऱ्यांनी केली पाहणी
मुलांना शाळेबरोबरच आजी आजोबांच्या महत्त्वपूर्ण नात्याची नव्याने ओळख होऊन त्याची दृढता होण्यासाठी “आजी आजोबा” दिवस साजरा होणे आवश्यक आहे.(Grandparents day) प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या रविवारी “आजी आजोबा दिवस साजरा केला जातो. त्या अनुषंगाने या वर्षी 10 सप्टेंबर, 2023 रोजी “आजी आजोबा” दिवस असून त्याअनुषंगाने त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी हा उपक्रम राबवून राज्यस्तर, जिल्हास्तर व शाळास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
या दिवशी आजी आजोबांकरिता खालील प्रमाणे उपक्रम राबविण्याच्या सूचना
सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचा परिचय करून द्यावा.
आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, चित्रकला, नृत्य असे कार्यक्रम आयोजित करावेत.
विटीदांडू, संगीत खुर्ची असे खेळ सुद्धा ठेवण्यास हरकत नाही.
संगीत खुर्चीसारख्या खेळात सहभागी होऊन बालपणीच्या आठवणी ताज्या करता येतील.
आजी आजोबां सोबत शाळेतील शिक्षकांनी सुद्धा सहभाग घ्यावा.
पारंपरिक वेशभूषेमध्ये आजी आजोबा यांना बोलवावे. (सदर बाब ऐच्छीक असावी.)
महिलांसाठी मेहंदी आणि वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपल्या लाडक्या आजी आजोबांसाठी यावेळी कलाकृती सादर कराव्यात.
आजीच्या बटव्याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगावे.
झाडे लावणे आणि पर्यावरणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगावे.