Pimpri News : राज्य शासनाकडून बैलगाडा शर्यतीसंबंधी सर्व गुन्हे मागे घेत बैलगाडा मालकांना दिला मोठा दिलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी महाविकास आघाडी सरकारचे मानले आभार

एमपीसी न्यूज – राज्य शासनाने बैलगाडा शर्यत आयोजकांवरील विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेतले आहेत. त्याबाबतचा जीआर जारी करत बैलगाडा शर्यत मालकांना मोठा दिलासा दिला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. गुन्हे मागे घेतल्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि बैलगाडा शर्यतासाठी सातत्याने प्रयत्न करणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचेही गव्हाणे यांनी आभार मानले.

प्रसिद्धी पत्रकात गव्हाणे म्हणतात, सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. बंदी असताना अनेक बैलगाडा प्रेमींकडून देवी-देवतांच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय शर्यतीवरील बंदी उठवावी या मागणीसाठी आंदोलने झाली होती. आंदोलन केल्यामुळे अनेक बैलगाडा मालक व शर्यत आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी सरकारकडे जोरदार पाठपुरावा सुरु केला. त्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी मोठी साथ दिली. राज्य शासनाच्या माध्यमातून वकिलांची तगडी फौज सर्वोच्च न्यायालयात उभी केली.

अखेर राज्य सरकारच्या वकिलांचा युक्तीवाद मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली. अटी शर्तींवर बैलगाडा शर्यती सुरु करण्याचे निर्देश दिले. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्य शासनाकडे केलेल्या प्रयत्नांना यश आले. बैलगाडा शर्यतीवरील बंदीच्या काळात बंदी उठावावी यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली होती. अनेकांनी शर्यतींचे आयोजन देखील केले होते. यादरम्यान अनेक लोकांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर बैलगाडा शर्यतीसंबंधी विविध गुन्हे मागे घ्यावे ही मागणी अनेक दिवसांपासून होत होती.

बैलगाडा मालकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बैलगाडा शर्यतीअंतर्गत दाखल सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. गुन्हे मागे घेण्याबाबतचा शासनाकडून जीआर जाहीर करण्यात आला आहे. यामुळे गुन्हा दाखल झालेल्या बैलगाडा शर्यत आयोजकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बैलगाडा मालक, आयोजकांवरील गुन्हे मागे घेतल्याने गव्हाणे यांनी महाविकास आघाडीचे, नेत्यांचे जाहीर आभार मानले.

बैलगाडा शर्यतीमुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना!

राज्यभरात अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यती भरविल्या जातात. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक बैलगाडा शर्यंतीचे आयोजन केले जाते. ग्रामीण भागातील अर्थकारण बैलगाडा शर्यतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. महाविकास आघाडीने प्रयत्न करुन, नामावंत वकिलांच्या माध्यमातून बैलगाडा शर्यतीचे महत्व, गरज न्यायालयाला पठवून दिली. त्यानंतर न्यायालयानेही बैलगाडा शर्यतीला परवानी दिली.

सध्या विविध गावच्या यत्रा, जत्रा, उरुस सुरु आहेत. यानिमित्त पुणे जिल्ह्यात मोठ्या संख्येने बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जात आहे. त्याला नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. बैलगाडा शर्यतींमुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना मिळत आहे. त्यामुळे बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असल्याचेही शहराध्यक्ष गव्हाणे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.