Nigdi : सुरक्षा समिती स्वयंसेवक राबविणार आषाढी वारीत हरित वारी उपक्रम 

एमपीसी न्यूज –  जगतगुरु संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या विशेष पोलीस अधिकारी, पोलीस मित्र स्वयंसेवकांनी पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांची चिंचवड येथील पोलीस आयुक्त मुख्यालयात भेट घेतली. यंदाची आषाढी वारी सुरक्षित संपन्न करण्यासाठी समितीचे १५० एसपीओ – पोलीस मित्र हे पोलीस यंत्रणेस मदत करणार आहेत. वैष्णवांना मदत करण्याबरोबरच पालखी मार्गावर वृक्षारोपण करून हरित वारी हा सामाजिक उपक्रम समितीच्या वतीने राबविण्यात येणार आहे.

या “हरित वारी” उपक्रमाची सुरुवात आज रोजी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांना “मोगरा रोप” देऊन करण्यात आली. याप्रसंगी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी विजय पाटील, अर्चना दाभोळकर, विजय मुनोत, बाबासाहेब घाळी, संतोष चव्हाण, अँड विद्या शिंदे, कविता बोण्डे, विभावरी इंगळे, गौरी सरोदे, देवयानी पाटील, सुलभा धांडे, विजया पाटील, अनामिका नारखेडे, प्रणाली चौधरी, जयेंद्र मकवाना, राम सुर्वे, मनोज ढाके, अमोल कानु, तेजस सापरिया, विशाल शेवाळे, गोपाळ बिरारी, उमेश कांगुडे, मंगेश घाग, राजकुमार कांबिकर, जयप्रकाश शिंदे, संदीप सकपाळ, लक्ष्मण इंगवले, राजेश बाबर उपस्थित होते.

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन म्हणाले,”गेल्या अनेक वर्षांपासून स्वयंसेवकांची मदत पालखी सोहळ्यासाठी सातत्याने होत आहे. वारकरी बंधू आणि भगिनींना विनासायास पालखी मार्गावर सेवा व मदत देण्यासाठी स्वयंसेवकांनी सज्ज रहावे. समितीचा वृक्षारोपणाचा संकल्प नक्कीच कौतुकास्पद आहे.”

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” येत्या दि. २४ जूनपासून पालखी सोहळ्यास सुरुवात होणार आहे. आपल्या संपूर्ण देशात व महाराष्ट्र राज्यात भीषण दुष्काळ पडलेला आहे. शेतकरीसुद्धा पाणी टंचाईमुळे हवालदील झालेला आहे. पेरण्या सुद्धा अद्याप झालेल्या नाहीत. अशा दुष्काळी पार्श्वभूमीवर यंदा पालखी सोहळा सुरू होणार आहे. दुष्काळ संपुष्टात येण्याकरिता व पावसाच्या सरी कोसळण्याकरिता समस्त वारकरी संप्रदाय वारीमध्ये सामील असणार आहे. राज्यातील दुष्काळ समूळ नष्ट करण्याकरिता वृक्षलागवड आवश्यक आहे. त्याकरिताच “हरित वारी” उपक्रम समितीच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचा संकल्प समितीने केलेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.