Pimpri : महापालिकेतर्फे राजीव गांधी यांना अभिवादन 

एमपीसी न्यूज – भारताचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर राहुल जाधव व उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच सदभावना दिनानिमित्त शपथही यावेळी ग्रहण करण्यात आली.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आज (सोमवारी)सकाळी झालेल्या या कार्यक्रमास सभागृह नेते एकनाथ पवार, ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आदि मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही प्रकारच्या हिसांचाराचा अवलंब न करता, वैयक्तिक किंवा सामुहिक स्वरुपाचे सर्व मतभेद विचार विनिमय करुन तसेच संविधानिक मार्गाचा अवलंब करुन, सोडविण्याची प्रतिज्ञा, सदभावना दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली. सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी प्रतिज्ञापत्राचे वाचन केले.

जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्यासाठी काम करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.

तसेच विविध संस्था व संघटनांच्या माध्यमांतून भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.