Pimpri : महिला सूत्रधार असलेली ‘ही’ टोळी डॉक्टरांना एकांतात गाठून ब्लॅकमेल करायची, पुढे झाले असे…

group of female facilitators used to blackmail the doctors in private

एमपीसीन्यूज – रुग्णालयात बनावट रुग्ण पाठवून डॉक्टरला ब्लॅकमेल करून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पाच जणांच्या या टोळीची मुख्य सूत्रधार एक महिला आहे. या टोळीत दोन महिलांसह एक पोलीस कर्मचारी, एक पत्रकार आणि आणखी एका पुरुषाचा समावेश आहे. या सर्वांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.

रंजना वनवे, आरती चव्हाण, समीर थोरात, कैलास अवचिते, प्रदीप फासगे अशी आरोपींची नावे आहेत. यातील रंजना वनवे या टोळीची प्रमुख सूत्रधार आहे.

हडपसर परिसरातील एका रुग्णालयात 31 मे रोजी एक महिला रुग्ण म्हणून गेली होती. त्यानंतर डॉक्टर तपासणी करत असताना तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या महिलेच्या तीन साथीदारांनी रुग्णालयात घुसून ‘तुम्ही गर्भलिंग निदान चाचणी करता, आम्ही पोलिस आहोत, आता आम्ही तुमच्यावर कारवाई करतो’, अशी धमकी देऊन त्यांचे अपहरण केले होते.

हडपसर परिसरातील एका कार्यालयात त्यांना डांबून ठेवून त्यांच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितली होती. यातील पाच लाख 89 हजाराची रक्कम त्यांनी खंडणीपोटी घेतली होती.

दरम्यान, आरोपीच्या ताब्यातून सुटल्यानंतर संबंधित डॉक्टरने हडपसर पोलीस ठाणे गाठत झाला प्रकार त्यांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास करत होते. वरील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींनी असे प्रकार यापूर्वी अनेकदा केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

सरकारी अधिकारी, डॉक्टर आणि प्रतिष्ठित लोकांना गाठून त्यांना ब्लॅकमेल करून पैसे  उकळणे  हा त्यांचा नित्याचा व्यवसाय झाला होता.

वरील सर्व आरोपींनी गुन्हेगारी कृत्यासाठी संघटित टोळी तयार करून डॉक्टरचे  अपहरण केल्याचा आणि त्यानंतर खंडणी उकळल्याचा पुरावा मिळाल्यानंतर पोलिसांनी या सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like