GST Rate : पुन्हा खिशाला कात्री! 18 जुलै पासून पाकीटबंद (फ्रोजन) पदार्थांवर लागू होणार जीएसटी दर

एमपीसी न्यूज – महागाईने पोळलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे. जीएसटी परिषद नुकतीच पार पडली त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयामध्ये काही पदार्थांवरील जीएसटी दर (GST Rate) वाढवण्यात आले असून काही वस्तूंवरील जीएसटी सवलत मागे घेण्यात आली आहे त्यामुळे महागाईची झळ आणखी तीव्र होणार आहे. ही नवी करवाढ 18 जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. 

केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत जीएसटी दराबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यावेळी परिषदेत काही वस्तूंवर जीएसटी कर (GST Rate) लागू करणे, काही वस्तूंच्या जीएसटी दरात वाढ करणे आणि काही दरांच्या सवलती मागे घेणे इ. बाबींवर निर्णय घेण्यात आला.

या बैठकीनंतर माध्यमांशी जीएसटी दरवाढीविषयी बोलताना सीतारमण म्हणाल्या, कॅसिनो, ऑनलाइन गेमिंग आणि घोड शर्यतीवरील कराचा प्रस्ताव पुनर्विचार करण्यासाठी मंत्रिगटाकडे पाठवण्यात आला आहे. गोव्याच्या अर्थमंत्र्यांनी कॅसिनोवरील जीएसटी दराबाबत चर्चा करण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे या तीन गोष्टींवरील जीएसटीवर पुनर्विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Maharashtra Political Crisis : मी पुन्हा येणार…! सत्तास्थापनेसाठी भाजप सज्ज, देवेंद्र फडणवीस बनणार मुख्यमंत्री

बैठकीत कोणते निर्णय झाले?

पाकीटबंद (फ्रोजन) आणि लेबलबंद खाद्यपदार्थांवर जीएसटी लागू करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सोयाबीन मटार या पदार्थांवर पाच टक्के जीएसटी (GST Rate) लागू करण्यात येणार आहे. या खाद्यपदार्थांच्या गटात मुरमुरेला सुद्धा सामील करण्यात आले आहे. आतापर्यंत सदर पदार्थांवर कोणताच जीएसटी दर आकारण्यात आला नव्हता.

दरम्यान, टेट्रा पॅक आणि बॅंक अर्थव्यवहारातील धनादेश सेवांवर सुद्धा 18 टक्के दर लागू होणार आहे, तर एटलससह नकाशा आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू होणार आहे. बजेट हाॅटेल आणि रुग्णालयांतील खोल्यांच्या दरावर जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हाॅटेल रूमसाठी 12 टक्के कर लागू करण्यात आला असून रुग्णालयातील खोल्यांसाठी (आयसीयू वगळता) 5 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.