Pune : पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

माजी आमदार मोहन जोशी यांची मागणी

एमपीसी न्यूज – यंदाच्या पावसाळ्यात केवळ साडेतीन महिन्यांत नैसर्गिक आपत्तीमुळे पुणे शहरात 54 हून अधिक नागरिक बळी गेले आहेत. याला जबाबदार धरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

आज त्यांनी या संदर्भातील पत्रक प्रसिद्धीस दिले. काल पावसामुळे सिंहगड रस्ता, धनकवडी, बिबवेवाडी अन्य परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. टिळक रस्त्यावर बस चालकाचा मृत्यू झाला. रोज पावसामुळे वाहतूक कोंडी होते. परंतु, प्रशासन व सत्ताधाऱ्यांना याचे काहीही गांभीर्य नाही. पानशेत धरण फुटल्याच्या घटनेनंतर गेल्या साडेतीन महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे एकाच मौसमात बळी जाण्याची घटना यावर्षी घडली आहे.

पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात नाला सफाई व पावसाळी गटारे साफ करण्याचा कामासाठी 130 कोटी रुपये खर्च केले. मात्र, पावसाने या सर्वांचा ढिसाळ कारभार उघडकीस आणला आहे. पुणे शहराचा प्रमुख या नात्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार गिरीश बापट यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.