Guhagar : रिसबूड कुलसंमेलन उत्साहात साजरे

एमपीसी न्यूज- रिसबूड ट्रस्ट आणि रिसबूड परिवाराच्या वतीने कोकणात गुहागर येथे नुकतेच रिसबूड कुलबांधवांचे दोन दिवसीय निवासी कुलसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. या कुलसंमेलनाला मुंबई पुण्यासहित महाराष्ट्राच्या इतर भागातील सुमारे 100 बांधव उपस्थित होते.

दोन दिवस चाललेल्या या संमेलनामध्ये संगीत, नृत्य, विविध गुणदर्शन, समुद्र किनारी फेरफटका, भेलपुरीचा आस्वाद, श्री दुर्गादेवी मंदिर ते श्री व्याडेश्वर मंदिर प्रभात फेरी असे कार्यक्रम उत्साहात पार पडले. वयाची 90 वर्ष आणि 75 वर्ष पूर्ण केलेल्या तसेच विवाहाचा सुवर्णमहोत्सव साजरा केलेल्या ज्येष्ठ रिसबुडांचा ट्रस्टचे पदाधिकारी आणि संमेलनस्थळी उपस्थित असलेल्या ज्येष्ठांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या संमेलनात गुहागर येथील रिसबूड बांधवांचे कुलदैवत श्री व्याडेश्वर मंदिरात लघुरुद्राभिषेक करण्यात आला तसेच कुलस्वामिनी श्री दुर्गादेवी मंदिरामध्ये बोडणाचा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. जयश्री रिसबूड, रजनी रिसबूड, सुलभा ताम्हणकर यांनी भारूड सादर केले. त्याचप्रमाणे रिसबूड ट्रस्ट मधील सदस्य सुरेश रिसबूड, प्राजक्ता रिसबूड, रजनी रिसबूड, अरविंद रिसबूड, विजयानंद रिसबूड यांनी आपापले उत्पादन, उपक्रम याविषयी माहिती दिली.

यावेळी पुणे येथील उद्योजक राजीव रिसबूड पुणे यांनी ‘तरुणांचा उद्योगात सहभाग’ या विषयावर आपले विचार मांडले. तरुणांनी नोकरी करण्याऐवजी उद्योजक होऊन अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे असे त्यांनी आवाहन केले. त्यासाठी तरुणांनी प्रथम अपयशाचा सामना करण्यास शिकले पाहिजे असा संदेशही त्यांनी दिला.

अध्यक्ष राम रिसबूड यांनी कुलसंमेलनाची परंपरा पुढे नेण्यासाठी नवीन पिढीने पुढे आले पाहिजे तसेच ज्येष्ठानी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे आवाहन केले. सूत्रसंचालन ट्रस्टचे सहसचिव अभिजित रिसबूड आणि पत्रकार विश्वास रिसबूड यांनी केले तर आभार ट्रस्टचे सचिव केदार रिसबूड यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.