Keshubhai Patel Passes Away : गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

एमपीसी न्यूज – गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं आज सकाळी निधन झाले आहे. ते 92 वर्षांचे होते तसेच त्यांच्यावर अहमदाबादमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते.

आज (गुरुवारी) सकाळी श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केशुभाई यांनी दोन वेळा गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते.

बंडखोरीमुळे केशूभाईंना दोन्ही वेळा मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. 2001 मध्ये त्यांच्या जागी नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तर सहा वेळा विधानसभेचे सदस्य झालेल्या केशुभाई यांनी 2012 मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देऊन स्वतःचा राजकीय पक्ष गुजरात परिवर्तन पक्ष या नावाने सुरू केला. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत विसावदरमधून विजयी देखील झाले होते. मात्र त्यानंतर तब्येत बिघडल्याने त्यांनी 2014 मध्ये राजीनामा दिला.

केशुभाई यांच्या निधनांतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं, “जनसंघ आणि भाजपला बळकट करण्यासाठी केशुभाईंनी संपूर्ण गुजरातभर प्रवास केला. त्यांनी आणीबाणीचा प्रखर विरोध केला. शेतकरी कल्याणाचे प्रश्न त्यांच्या जिव्हाळ्याचे होते. आमदार, खासदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री असोत त्यांनी शेतकरी कल्याणाचे अनेक मार्ग शोधले.”

“केशुभाईंनी माझ्यासह अनेक तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि तयार केलं. प्रत्येकालाच त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडला. त्यांच्या निधनाने एक भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने आपण सर्वजण दु:खी आहोत. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे,” असंही मोदींनी म्हटलं आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.