Gujrat CM : भूपेंद्र पटेल यांची गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड

एमपीसी न्यूज – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी अचानक मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रूपाणी यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. आज भाजपच्या दीर्घकाळ चाललेल्या बैठकीत भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

भूपेंद्र पटेल हे घरलोदिया येथून आमदार आहेत आणि माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या जवळचे समजले जातात. भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचं सभापती म्हणून देखील काम पाहिलं आहे. हार्दिक पटेलच्या नेतृत्वात पाटीदार समाजानं आंदोलन केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना हटवून रुपाणींना मुख्यमंत्री केलं होतं.

विजय रुपाणी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा काल (11 सप्टेंबर) राजीनामा दिला. रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली होती. पत्रकार परिषद घेऊन आपण राजीनामा देत आहोत, हे त्यांनी जाहीर केले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.