Wakad : ‘त्या’ गुटखा विक्रेत्याचा जामीन न्यायालयाने नाकारला; रवानगी थेट तुरुंगात

एमपीसी न्यूज – अवैध धंदे बंद करण्याचे निवेदन देणाऱ्या आपना वतन संघटनेच्या सदस्याच्याच वडिलांना पोलिसांनी अवैधरित्या प्रतिबंधित गुटखा विकताना एका कारसह अटक केली आहे. त्या गुटखा विक्रेत्याचा न्यायालयाने जामीन नाकारला असून त्याची रवानगी थेट तुरुंगात केली आहे.

अन्वर अली सुभेदार शेख (वय 58, रा. सम्राट चौक, वाकड) असे अवैधरित्या गुटखा विकताना सापडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अनिल सदाशिवराव गवते यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी शेख कार (एम एच 31 / डी सी 5103) मधून प्रतिबंधित गुटखा विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शेख याच्यावर कारवाई करत त्याला अटक केली. आरोपी कडून 60 हजार 206 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि तीन लाख रुपये किमतीची कार जप्त केली. त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम 188, 272, 273 तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले. आरोपीने जामीन मिळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर न करता त्याची रवानगी थेट तुरुंगात केली आहे. दरम्यान, आरोपीच्या एका मुलाने कर्ज देण्याच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. सामाजिक कार्यकर्त्याचा भाऊ आणि वडील जर अशा प्रकारची कामे करीत असतील तर सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अन्य नागरिकांना सामाजिक सुधारणांचे डोस पाजणे कितपत योग्य आहे, अशी चर्चा सध्या शहरात सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.