Pune News : पुणे जिल्ह्यात वर्षभरात तब्बल पावणे चार कोटींचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – पुणे शहर पोलीस, पिंपरी-चिंचवड पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी मागील एका वर्षात 3 कोटी 78 लक्ष 53 हजार रुपयांचा गुटखा पकडला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समितीच्या पुणे जिल्ह्याच्या समन्वयक अधिकारी डॉ. सुहासिनी घाणेकर यांनी दिली.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांच्या अध्यक्षेतखाली पुणे येथे संपन्न झाली.

जिल्हा समन्वयक अधिकारी डॉ. सुहासिनी घाणेकर यांनी वर्षभरात तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाबाबत वर्षभरात 19 प्रशिक्षण घेण्यात आले. त्यामध्ये यावर्षी 607 नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले आहे.

पुणे शहर पोलीस, पिंपरी-चिंचवड पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी 3 कोटी 78 लक्ष 53 हजार रुपयांचा गुटखा आणि 9 लाख 83 हजार रुपयांचा हुक्का व इतर पदार्थ जप्त केले आहेत. तसेच चार प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने 3 हजार 325 किलोग्रॅम तंबाखूजन्य पदार्थ जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत दृकश्राव्य चित्रफीतीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी. शालेय विद्यार्थ्यांना याविषयी माहिती देण्यात यावी. समाज माध्यमांसह अन्य माध्यमांचा उपयोग करून जनजागृतीवर भर द्यावा आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.