Pimpri : इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे दीपस्तंभ फाउंडेशनच्या यजुर्वेन्द्र महाजन यांना गणाश्रया पुरस्कार

अंध स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडची एक लाखांची मदत

एमपीसी न्यूज – यजुर्वेन्द्र अनिल महाजन यांचा इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे गणाश्रया पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच त्यांनी अंध आणि अपंग मुलांसाठी सुरु केलेल्या दीपस्तंभ संस्थेला क्लबकडून एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड आणि डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने यजुर्वेन्द्र महाजन यांचे ‘स्पर्धा परीक्षांची तयारी’ या विषयावर मार्गदर्शन सत्र झाले. प्राचार्य डॉ. स्नेहल अग्निहोत्री कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या. यावेळी पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील एसीएस महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात यजुर्वेंद्र अनिल महाराज यांना पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमासाठी इनर व्हीलच्या सदस्य जयश्री कुलकर्णी, रेणू मित्रा, डॉ. रंजना कदम, सुजाता ढमाले, अॅड. अर्जुन दलाल, रो रवी राजापूरकर, माजी जिल्हाध्यक्षा सुनंदा हुल्याळकर आणि महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.

इनर व्हील क्लब निगडी प्राईडतर्फे यजुर्वेन्द्र महाजन यांना प्रमुख पाहुण्या चारू चिंचणकर यांच्या हस्ते गणाश्रया पुरस्कार आणि मानपत्र दिले. माजी अध्यक्षा आरती मुळे यांनी मानपत्राचे वाचन केले. अध्यक्षांच्या हस्ते दीपस्तंभ संस्थेला एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली. अध्यक्षा प्रतिभा जोशी दलाल यांनी स्वागतपर भाषणात महाजन यांच्या कार्याने प्रभावित असल्यामुळेच या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले.

महाजन यांनी चर्चेतून प्रबोधन या अतिशय प्रभावी पद्धतीने मुलांना स्वतःच्या भविष्याबद्दल डोळसपणे विचार करून नुसती स्वप्न न बघता ध्येय आणि उद्दिष्ट पूर्ती कशी करता येईल, यासंबंधी विचार मंथनासाठी प्रेरित केले. स्पर्धा परीक्षा देण्याचे फायदे, त्याचा अभ्यास कसा करावा, त्याबाबतचे नियोजन कसे करावे याबाबतचे अनेक पैलू त्यांनी उलगडून सांगितले. माणूस म्हणून जगत असताना आपण करत असलेल्या कामाबद्दल आपण प्रामाणिक आणि निष्ठेने राहिले पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला. पुरस्कार ही आणखी चांगले काम करण्याची उमेद आहे. इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने या कामाला आर्थिक मदतीचे पंख लावले आहेत. त्याबद्दल त्यांचे आभार देखील त्यांनी व्यक्त केले.

स्वामी विवेकानंद प्रेरणास्थान असलेल्या महाजन यांनी समाजातल्या वंचित, अनाथ, अपंग अंध, आदिवासी आणि दुर्बल घटकातील मुलांसाठी दीपस्तंभ गुरुकुल, दीपस्तंभ मनोबल, दीपस्तंभ संजीवन अशा अनेक संस्था सुरु केल्या आहेत. या संस्थांमध्ये शेकडो विद्यार्थी निःशुल्क राहून शिकत आहेत. प्रा. डॉ. निकम यांनी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्राची माहिती दिली. चारू चिंचणकर यांनी इनर व्हीलच्या माध्यमातून महिला, अपंग आणि विशेष मुलांच्या सबली करणाबाबत राबविले जात असलेल्या उपक्रमांबाबत माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात डॉ. स्नेहल अग्निहोत्री यांनी इनर व्हीलच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि यजुर्वेन्द्र यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्याबद्दल आभार मानले.

सूत्रसंचालन प्रतिमा दातार यांनी केले. आभार प्रा. नीता मोहिते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अग्निहोत्री, प्रा. मोहिते, अॅड. अर्जुन दलाल यांनी विशेष सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.