H3N2 : पिंपरी-चिंचवडमध्ये एच3एन2 मुळे वृद्धेचा मृत्यू; काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन

एमपीसी न्यूज : पुणे  आणि पिंपरी चिंचवड  शहरामध्ये H3N2 विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये H3N2 ने आणखी एका रुग्णाचा बळी घेतला आहे. 80 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी या वृद्ध महिलेला  H3N2 विषाणूची लागण झाली होती. (H3N2) पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या मृत्यूमुळे H3N2 विषाणूच्या मृतांची संख्या दोनवर गेली आहे. शहरात आत्तापर्यंत H3N2 च्या 17 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 15 रुग्णांनी यावर मात केली आहे. तर दुसरीकडे करोनाच्या रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात एक जानेवारीपासून ‘एच 3 एन 2’ बाधित 17 रुग्ण आढळले. त्यापैकी 15 रुग्ण बरे झाले आहेत. सोमवारी 80 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. 16 मार्च रोजी  भोसरीतील एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. सद्यस्थितीत एकही रुग्ण शहरात नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Corona Update : शहरात कोरोनाचे 119 सक्रिय रुग्ण, रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे

शहरात सध्या कोरोना आणि सोबतच H3N2 विषाणूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात कोरोनाचे राज्यात सगळ्यात जास्त रुग्ण पुणे, मुंबई आणि ठाण्यात आहे. त्यामुळे राज्यात नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. सोबतच H3N2 विषाणूचेही रुग्ण राज्यात वाढत आहे. त्यात आता पिंपरी-चिंचवडमध्ये वृद्ध महिलेला  बळी गेल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरात 16 मार्चला H3N2 विषाणूचा पहिला बळी गेला होता. 73 वर्षीय रुग्णाला H3N2 विषाणूी लागण झाली होती.  8 मार्चला पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तेव्हा त्यांना H3N2 ची लक्षणे आढळली होती. म्हणून त्याच दिवशी त्यांचे नमुने पाठविण्यात आले. (H3N2) 10 मार्चला त्यांना H3N2 ची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. हृदयाशी निगडित त्यांना अधिकचा  त्रास होत असल्यानं त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुणे आणि पिंपरी -चिंचवड शहरात मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं.  त्यानंतर चाचण्या वाढवण्याचे आदेश देण्यात आले होते.

इन्फ्लुएंझा विषाणूस घाबरून जावू नये. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप अशी लक्षणे असल्यास त्वरित महापालिकेच्या रुग्णालयात जाऊन  वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घ्यावा. स्वच्छ पाण्याने हात धुवावे. धूम्रपान टाळावे. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी. भरपूर पाणी प्यावे. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या आरोग्यदायी पदार्थाचा आहारात वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी टाळावे. मास्कचा वापर करावा असे आवाहन सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफने यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.