Pune : सरदार पटेल असते तर राममंदिरासाठी एवढा वेळ लागला नसता -पंडित वसंतराव गाडगीळ

ग्राहक पेठ तर्फे वयाची ९० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासद पं.वसंतराव गाडगीळ व शि.द.फडणीस यांचा सन्मान 

एमपीसी न्यूज – सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराच्या वेळी पुढाकार घेत ते काम पूर्ण केले. आज ७० ते ७५ वर्षे होऊन गेली, तरी देखील अयोध्येतील राममंदिराचा विषय पूर्ण होत नाही. सरदार वल्लभभाई पटेल जर आज असते, तर राममंदिरासाठी एवढा वेळ लागला नसता, असे सांगत पंडित वसंतराव गाडगीळ यांनी आठवणींना उजाळा दिला.

ग्राहक पेठ तर्फे वयाची ९० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा सन्मान सोहळा स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री अरुण देशपांडे, ग्राहक पेठेचे अध्यक्ष एस.आर.कुलकर्णी, कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, उपाध्यक्ष संध्या भिडे, राजेश शहा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पंडित वसंतराव गाडगीळ आणि ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार शि.द.फडणीस यांचा यावेळी सन्मानचिन्ह व शाल देऊन सन्मान करण्यात आला.
वसंतराव गाडगीळ म्हणाले, पुण्यामध्ये अनेक नामवंत आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करीत आहेत. त्यांच्या कार्याच्या माहितीचे संकलन करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. ग्राहक पेठ व त्याच्या संबंधित अनेकजण उत्तम कार्य करीत असून ही पुण्याची पुण्याई भारतभरच नव्हे, तर भारताबाहेर देखील जावी, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
अरुण देशपांडे म्हणाले, ग्राहकांचे हित जपणे ही व्यवसायिकाची सर्वप्रथम जबाबदारी असते. ग्राहक हित जपणारी ग्राहक पेठ ही जुनी संस्था आहे. ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम व ज्येष्ठ पुणेकरांचा सन्मान हा कार्यक्रम राबविणे कौतुकास्पद आहे.

सूर्यकांत पाठक म्हणाले, उत्पादक ते ग्राहक थेट व उत्तम दर्जाचे तांदूळ घाऊक दरात देण्याचा प्रयत्न ज्या ग्राहक पेठेच्या तांदूळ महोत्सवातून केला जातो, त्या महोत्सवाला पुणेकरांचा यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इतरत्र भाव वाढले, तरीही महोत्सवात भाववाढ केली गेली नाही, हे महोत्सवाचे वैशिष्टय होते. महोत्सवाच्या निमित्ताने ग्राहकांचे व प्रामुख्याने महिलांचे एकत्रिकरण हा देखील उद्देश होता, असेही त्यांनी सांगितले. सन्मान सोहळ्यानंतर अशोक हांडे यांचा मराठी बाणा हा कार्यक्रम पुणेकरांसाठी आयोजित करण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.