Hadapsar Crime News: धक्कादायक! सराईत गुन्हेगार 13 वर्षापासून वापरत होता पोलिसांचे बनावट ओळखपत्र

0

एमपीसी न्यूज – पोलिसांच्या नावाचे बनावट ओळखपत्र तयार करून ते राजरोसपणे वापरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. मागील 13 वर्षापासून तो हे बनावट ओळखपत्र वापरत होता. धक्कादायक म्हणजे त्याच्या विरोधात दंगल घडवणे, खंडणी मागणे, जाळपोळ करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

इम्तियाज इद्रीस मेमन असे या गुन्हेगाराचे नाव आहे. हडपसर पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी इम्तियाज मेमन

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांना त्यांच्या वरिष्ठांनी एका ओळखपत्राची छायांकित प्रत देऊन त्याची खातरजमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इम्तियाज मेमन त्याला बोलावून त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी त्याचे रेकॉर्ड तपासले असता हडपसर आणि वानवडी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात दंगल घडवणे जाळपोळ करणे यासारख्या पाच गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवतात त्याने बनावट ओळखपत्र वापरत असल्याचे कबूल केले.

आरोपीने 2007 मध्ये बनावट ओळखपत्र तयार करून घेतले होते. त्यावर स्वतःचे नाव, जन्मतारीख आणि स्वतःचा फोटो टाकून ते तो राजरोसपणे वापरत होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

जर एखादी व्यक्ती पोलिसांचे बनावट ओळखपत्र वापरत असल्याचा संशय नागरिकांना असल्यास त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशन अथवा पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवण्यात येईल, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.