Hadapsar: पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून खून, पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात

Hadapsar: Criminal murdered in Bhekarainagar last night due to old rivalry, police arrests three accused till now

एमपीसी न्यूज- एका सराईत गुन्हेगाराचा पूर्ववैमन्यातून कोयत्याने वार करुन खून करण्यात आला. हडपसरच्या भेकराईनगर भागात सासवड रस्त्यावरील हॉस्पिटलजवळ काल (शुक्रवारी) रात्री पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

शोएब मस्जीद शेख (वय 19, रा. भेकराईनगर, हडपसर) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. शोएब हा हडपसर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर मारहाणीचे अनेक गुुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी निलेश भाऊसाहेब मेमाणे (वय 26, रा. ढमाळवाडी, भेकराईनगर, हडपसर) या टेम्पोचालकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलिसांनी जीवन कांबळे व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भेकराईनगरमधील सासवड रोडवरील शारदा हॉस्पिटलशेजारच्या गल्लीत शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजता हा खून झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये 7 ते 8 जणांनी शोएबवर हल्ला केल्याचे दिसून येत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जीवन कांबळे व मयत शोएब हे एकाच परिसरात राहात होते. पूर्वी ते मित्र होते. ऑक्टोंबर 2018 मध्ये शोएब व जीवन कांबळे त्यांच्यात वाद झाला होता. तेव्हा शोएब याने त्याला मारहाण केली होती. त्याचा राग कांबळे याच्या मनात होता. त्याचा बदला घेण्याची संधी शोधत होता. जीवन कांबळे याच्यावरही मारहाण, प्राणघातक हल्ला अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. दोघांवरही खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता. गेल्या वर्षी निवडणुकीपूर्वी त्यांना जामीन मिळाला होता.

शोएब हा राज सरकार हा ग्रुप चालवत होता. शुक्रवारी सकाळी तो जीवन कांबळे याच्या घरासमोर गेला व त्याने शिवीगाळ केली होती. त्यामुळे जीवन कांबळे व त्याच्या साथीदारांनी काल रात्री पावणेअकराच्या सुमारास भेकराईनगर येथे एकट्याला गाठले व त्याच्यावर कोयत्याने वार करुन त्याचा निर्घृण खून केला.

घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त सुहास बावचे व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी जीवन कांबळे याच्याबरोबर असणार्‍या तिघांना ताब्यात घेतले असून कांबळेचा शोध सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.