Hadapsar : ….. अशी केली ट्रक चालकाचा खून करून पसार झालेल्या चोरट्याना अटक

हडपसर पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – ट्रकच्या बॅट-या चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना विरोध करताना झालेल्या झटापटीत ट्रकचालकाचा खून करून पसार झालेल्या आरोपींना हडपसर पोलिसांनी केवळ 2 तासांच्या आतच अटक केली. काल गुरूवारी (दि.22) रात्री दीडच्या सुमारास ही घटना कवडीपाट टोल नाक्याजवळ घडली होती.

महेश बबन गजसिंह (वय 22, रा.उरूळी देवाची,पुणे), विजय बाळू सोनवणे (वय 19, रा. उरूळी देवाची,पुणे), चतुरधन मनोहर कळसे (वय 23, रा.इस्रात बाग, कोढवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दत्तात्रय भोईटे (वय 40)असे खून करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय भोईटे यांनी कवडीपाट टोल नाक्याजवळ त्यांचा ट्रक उभा करून ते झोपी गेले होते. दरम्यान ट्रकच्या बॅट-या चोरण्यासाठी तीन चोरटे तिथे आले आणि त्यांनी बॅट-या चोरी करत असताना ट्रकचालक दत्तात्रय यांनी जाग आली. त्यांनी खाली उतरून चोरटयांचा विरोध केला व त्या दरम्यान झालेल्या झटापटीत त्यातील एकाने दत्तात्रय यांच्या छातीवर टोकदार हत्याराने वार केला व त्यामध्ये गंभीररित्या जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. खून करून आरोपी तेथून पळून गेले.

या गुन्ह्याचा हडपसर पोलिसांनी कसोशीने तपास करून गुन्ह्याच्या ठिकाणी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेत होते. तपासादरम्यान बातमीदारामार्फत सोलापूर – पुणे रस्त्यावर द्राक्ष संशोधन केंद्राच्या गेटसमोर ट्रकचालकाचा खून करून तिघेजण जेएसपीएम कॉलेजच्या पाठीमागे थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ताबडतोब जेएसपीएम कॉलेजच्या पाठीमागील डोंगरावर थांबलेल्या आरोपींना जागीच पकडले. पोलिसांनी त्यांच्याजवळ कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक हेमराज कुंभार, पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणार, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण लोढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल काळे, पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे, पोलीस हवालदार राजेश नवले, पोलीस नाईक प्रताप गायकवाड, सैदोबा भोजराव, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, पोलीस कर्मचारी नितीन मुंढे, अकबर शेख, शशिकांत नाळे, अनिल कुसाळकर, अमित कांबळे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.