hadapsar news: हडपसर परिसराचा पाणीपुरवठा 18 सप्टेंबर पासून सुरळीत होणार – अधिकाऱ्यांचे आश्वासन

एमपीसी न्यूज – येत्या 18 सप्टेंबरपासून हडपसर परिसराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार चेतन तुपे यांना दिले.

हडपसर परिसरातील अपुऱ्या व विस्कळीत पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांकडून सातत्याने येत असलेल्या तक्रारीची दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे व आमदार तुपे यांनी आज रामटेकडी येथील पाण्याच्या टाकीची पाहणी केली. त्यावेळी पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर व अन्य अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.

सातत्याने अपुरा व अनियमित पाणी पुरवठा हा हडपसरच्या नागरिकांवर अन्याय असून एका बाजूला मध्य पुण्यातील पेठांमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा होत असताना हडपसर परिसरात 4-5 तास पुरेशा दाबाने पाणी का पुरवले जात नाही, असा सवाल करून डॉ. कोल्हे यांनी याबाबत प्रशासन काय नियोजन करणार आहे, अशी विचारणा केली. यावेळी आमदार तुपे व हडपसरच्या नगरसेवकांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

डॉ. कोल्हे व आमदार तुपे यांनी हडपसरसाठी सध्या कमी मिळणारे 40 एमएलडी पाणी कसे उपलब्ध करून देणार व नागरिकांना पुरेशा दाबाने कधीपासून पाणी मिळेल, याचा निश्चित प्लान आपण सांगा,  असा आग्रह धरला. त्यानंतर पावसकर यांनी 18 सप्टेंबरपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन दिले. 18 सप्टेंबरपासून पाणी पुरवठा सुरळीत झाल्यानंतर आपण पुन्हा आढावा घेणार असल्याचे यावेळी डॉ. कोल्हे व आमदार तुपे यांनी सांगितले.

हडपसरचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी स्वत: लक्ष घातले असून आज आमदार चेतन तुपे यांच्या समवेत रामटेकडीवरील पाण्याच्या टाकीची पाहणी केली. तसेच पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी नगरसेवक योगेश ससाणे, अशोक कांबळे, नाना भानगिरे, मारुती आबा तुपे, नगरसेविका हेमलता मगर, पूजाताई कोद्रे, वैशाली बनकर, नंदाताई लोणकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.