Hadapsar :एटीएम मशीन फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीस अटक

एमपीसी न्यूज – एटीएम मशीन फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना अटक करून हडपसर पोलीसांनी दरोड्याचा डाव उधळून टाकला. त्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये त्यांच्याकडून 20 गुन्हे उघडकीस आणून तब्बल 19 लाख 50 हजारांचा ऐवज पोलिसांनी आतापर्यंत जप्त केला आहे.
ही कारवाई शनिवारी (दि.8) रात्री साडेअकराच्या दरम्यान हडपसर येथील भागीरथी नगरच्या पाठीमागील बाजूच्या कॅनॉलवर करण्यात आली होती.

अर्जुनसिंग रजपूतसिंग दुधानी (वय 45, रा. भापकर वस्ती, मांजरी), गोगलसिंग बादलसिंग कल्याणी (वय 46, रा. कोठारी मील, रामटेकडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर त्यांचे टोळातील साथीदार पैतर गब्बरसिंग टाक, तिलकसिंग गब्बरसिंग टाक, विकीसिंग जालिंदर कल्याणी (सर्व रा. रामटेकडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरात पोलिसांना गस्त घालत असताना शनिवारी रात्री माळवाडी येथील एका एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले दिसले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत टोळीतील तिघांना अटक केली. तर टोळीतील तिघेजण तेथून पळून गेले. या कारवाईदरम्यान आरोपींकडून दोन बोअर कटर, 4 लोखंडी कटावण्या, लोखंडी सुरा, मिरची पावडर व एक कार असा तब्बल 1 लाख 27 हजार 950 रूपये किंमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

या गुन्ह्यातील आरोपींकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी चोऱ्या, घरफोडी, वाहन चोरी यांसारखे 20 गुन्हे केल्याचे उघडकीस आले.
पोलिसांनी आरोपींकडून आत्तापर्यंत 1 कार, 1 दुचाकी, 240 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 1 टी.व्ही,  असा एकूण 19 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.