Hadapsar : सत्संग शिबिरामध्ये राहून चो-या करणा-या दोन भोंदू सत्संगींना बेड्या

एमपीसी न्यूज – आळंदी येथे एका सत्संग शिबिरात राहून सुट्टीच्या दिवशी घरफोड्या करणा-या दोन भोंदू सत्संगी विद्यार्थ्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 131 ग्रॅम सोन्याचे दागिने, पाच दुचाकी, 10 मोबाईल फोन, दोन एलसीडी टीव्ही, एक कॅमेरा आणि 26 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ११ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज (गुरुवारी) मंत्री मार्केट, हडपसर येथे करण्यात आली.

सागर दत्तात्रेय भालेराव (वय 21, रा. देवाची आळंदी. मूळ रा. मांजरी, हडपसर), स्वप्नील नामदेव गिरमे (वय 24, रा. देवाची आळंदी. मूळ रा. हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरात मागील काही दिवसांपासून घरफोड्या आणि चो-यांचे प्रमाण वाढले होते. त्याबाबत पथके तैनात करून गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे आणि पोलीस शिपाई नितीन मुंढे यांना माहिती मिळाली की, हडपसर परिसरात चो-या करून आळंदी येथील एका सत्संग शिबिरात दोन तरुण राहत आहेत. ते आज त्यांच्याकडील सोने विकण्यासाठी हडपसर मधील मंत्री मार्केट येथे येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी मार्केट परिसरात सापळा रचून सागर आणि स्वप्नील या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले.

दोघांकडे चौकशी केली असता त्यांच्याजवळ सोन्याचे दागिने मिळाले. त्यांनी ते हडपसर परिसरातून चोरी केल्याचे सांगितले. हडपसर भागात चोरी करून कोणाला संशय येऊ नये यासाठी आळंदी येथील एका सत्संग शिबिरात मागील दोन महिन्यांपासून राहत आहेत. सुट्टीच्या दिवशी भाजीपाला आणण्याच्या बहाण्याने शिबिरांमधून बाहेर पडून शहरात घरफोड्या व चोऱ्या करीत असल्याचेही आरोपींनी कबूल केले. आरोपींकडून 131 ग्रॅम सोन्याचे दागिने, पाच दुचाकी, 10 मोबाईल फोन, दोन एलसीडी टीव्ही, एक कॅमेरा आणि 26 हजार रुपये रोख असा लाखो रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

  • आरोपी स्वप्नील हा हडपसर पोलीस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार आरोपी होता. त्याने पुणे शहर आणि परिसरात वाहन चोरी, घरफोडी, चोरी असे गुन्हे केल्याचे सांगितले आहे. या कारवाईमुळे हडपसर पोलीस ठाण्यातील घरफोडीचे २० घरफोडी आणि वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.