Hadapsar : वसंत मोरे यांच्या विजयासाठी हडपसर मतदारसंघात आज होणार ‘राज’गर्जना

एमपीसी न्यूज – हडपसर मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांच्या विजयासाठी राज ठाकरे आज जाहीर सभा घेणार आहेत. बंटर हायस्कूल हडपसर येथे सायंकाळी 6 वा. ही सभा होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वसंत मोरे यांनी केले आहे. ‘ये लाव रे तो व्हिडिओ’ लागणार भाग दोन, विद्यमानांची होणार पोलखोल, मग येताय ना व्हिडीओ पाहायला, असे आवाहनही करण्यात आले आहे.

भाजप – शिवसेनेच्या भ्रष्ट कारभारावर राज ठाकरे हल्लाबोल करणार आहेत. कात्रज, कोंढवा, हडपसर, मुंढवा, महमदवाडी, महादेवनगर, मांजरी हा संपूर्ण मतदारसंघ मोरे यांनी पायी फिरून पिंजून काढला. त्यांच्या कोपरा सभांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. हडपसर मतदारसंघाच्या विकासाचे ‘मॉडेल’ आपल्याकडे तयार आहे.

आमदार झाल्यावर कचरा, पाणी, रस्त्यांची समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले. मागील 20 वर्षे मोरे हे नगरसेवक आहेत. त्यांनी कात्रज भागात कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत. त्यांच्या सारख्या अनुभवी नेतृत्वाला विधानसभेत पाठविणारच असल्याचा निर्धार कात्रज, कोंढवा, हडपसर मतदारसंघातील जनतेने केला आहे. 1 लाख मतांनी मोरे विजयी होणार असल्याचा विश्वास मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. मोरे यांनी आजपर्यंत केलेले काम घरोघरी कार्यकर्त्यांनी पोहोचविले आहेत.

स्थानिक आमदाराच्या भ्रष्ट कारभारावर मोरे यांनी पुणे महापालिकेत वारंवार आवाज उठविला. त्यावेळी राष्ट्रवादी गप्प होती. आज मात्र माझेच मुद्दे घेऊन राष्ट्रवादी टीका करीत आहे. राष्ट्रवादी, भाजप शिवसेनेला हडपसर भागातील नागरिक थारा देणार नाही. यावेळी हडपसर मतदारसंघात परिवर्तन अटळ असल्याचा दावा मोरे यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.