Hadapsar : पैशाच्या वादातून धारदार शस्त्राने वार करत तरुणाने केला मित्राचा खून

एमपीसी न्यूज- धारदार शास्त्राने वार करून एका तरुणाने आपल्या मित्राचा खून केला. ही घटना हडपसर येथील हडपसर-सासवड रस्त्यावरील तुकाई दर्शनसमोरील अंगूरवाईन्स जवळ काल, सोमवारी (दि.14) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. पैशाच्या वादातून हा खून झाल्याचे तपासात समोर आले आहे.

राहुल प्रल्हाद पाटील (वय 32 रा. भेकराईनगर,मूळ रा. धुळे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गौरव पाटील (रा. काळेपडळ) याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल पाटील आणि त्याचा मित्र गौरव या दोघांमध्ये काल रात्री आर्थिक देवाण घेवाणीमुळे वाद झाले होते. हे वाद विकोपाला जाऊन रागाच्या भरात गौरवने राहुलवर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये राहुल गंभीररीत्या जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर फरार झालेल्या गौरव पाटील याला हडपसर पोलिसांनी शिताफीने पकडले. गौरवसोबत आणखी साथीदार असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

याप्रकरणी पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, युनीट-5 चे निरीक्षक दत्ता चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास गुन्हे निरीक्षक शिवाजी शिंदे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.