Haider Ali : पाकिस्तानच्या हैदर अलीची पदापर्णातच विक्रमला गवसणी

विराट कोहली, रोहित शर्मासारख्या बड्या खेळाडूंनादेखील हा पराक्रम करता आलेला नव्हता.

एमपीसी न्यूज – पाकिस्तानच्या हैदर अली याने पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक ठोकले आहे. त्याने 33 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 54 धावा केल्या. पहिल्या T20 सामन्यात अर्धशतक ठोकणारा तो पहिलाच पाकिस्तानी खेळाडू ठरला. विराट कोहली, रोहित शर्मासारख्या बड्या खेळाडूंनादेखील हा पराक्रम करता आलेला नव्हता.

विराट कोहली पदार्पणाच्या सामन्यात 26 धावांवर बाद झाला होता. तर रोहितला पदार्पणाच्या सामन्यात फलंदाजीच मिळालेली नव्हती. भारताकडून पदार्पणाच्या T20 सामन्यात अर्धशतक केवळ अजिंक्य रहाणेने झळकावले होते. हैदर अली हा पाकिस्तानकडून अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू ठरला.

याआधी पदार्पणाच्या सामन्यात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम उमर अमिनच्या नावे होता. त्याने 47 धावा केल्या होत्या. त्यापाठोपाठ हाफीजने पदार्पणाच्या सामन्यात 46, तर हुसैन तलतने 41 धावा केल्या होत्या.

पाकिस्तानच्या संघाने तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना पाच धावांनी जिंकला आणि मालिका 1-1 अशी बरोबरी सोडवली. हैदर अली आणि अनुभवी मोहम्मद हाफीज यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकने 190 धावा केल्या.

इंग्लंडकडून मोईन अलीने दिलेली एकाकी झुंज तोकडी पडली आणि यजमानांना पराभवाचा सामना करावा लागला.

सलग दोन अर्धशतके ठोकणाऱ्या मोहम्मद हाफीजला सामनावीर आणि मालिकावीर घोषित करण्यात आले. मोहम्मद हाफीजने T20 कारकिर्दीत दुसऱ्यांदा अर्धशतकी खेळीची हॅटट्रिक केली.

2012 मध्येदेखील सलग तीन T20 अर्धशतके झळकावली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर त्याने ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी केली.

गेलनेदेखील आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळ्या वेळी अर्धशतकांची हॅटट्रिक केली होती.

या यादीत भारतीय कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टील हे दोघे 3 हॅटट्रिक्ससह अव्वल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.