Pimpri : माझ्या कामाचा अर्धा वेळ रस्त्यावर – आर. के. पद्मनाभन

एमपीसी न्यूज – पोलीस समाजाला समाजात काम करताना दिसले पाहिजेत. ब-याच वेळेला सामाजिक दुष्प्रवृत्तींविरोधात नागरिक बोलत नाहीत. त्यांच्यामध्ये पोलिसांप्रती सकारात्मक भावना निर्माण व्हायला पाहिजे. तर ते पोलिसांशी चर्चा करतील. त्यामुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात कमी होईल. म्हणून मी माझ्या कामाचा अर्धा वेळ रस्त्यावर, नागरिकांशी चर्चा करत घालवणार आहे, असे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन म्हणाले.

पुणे पत्रकार संघाच्या वतीने पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याशी वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात आयुक्त पद्मनाभन बोलत होते. पोलिसांच्या कार्यशैलीत बदल करणं महत्वाचं आहे. सध्या दोन पोलीस गस्त घालतात. दोन पोलिसांचा रिस्पॉन्स टाइम फार कमी असतो. त्याऐवजी चार ते सहा पोलीस असतील तर त्यांचा रिस्पॉन्स टाइम वाढेल आणि पोलीस घटनास्थळी लवकर पोहोचतील. पोलिसांनी चौकीत बसण्याऐवजी चौकात बसावे. नागरिकांना पोलीस काम करत असल्याचे दिसायला हवे.

आर. के. पद्मनाभन म्हणाले, “‘अदृश्य पोलीस’ ही संकल्पना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. साध्या वेशात पोलीस गस्त घालतील. ज्या ठिकाणी गुन्हेगारी घडत असेल त्या ठिकाणी हे पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचतील. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनांवर कारवाई करण्यासाठी अदृश्य पोलिसांची मदत होणार आहे. वाहतूक पोलिसांसोबत इतर सर्व पोलीस वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी कटिबद्ध असतील. इतर पोलीस एखादा वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्याचा फोटो, वेळ, ठिकाण आणि उल्लंघनाचे स्वरूप वाहतूक पोलिसांना देतील. त्यानंतर वाहतूक पोलीस संबंधित चालकाला बोलावून त्याच्यावर कारवाई करतील. यामुळे रस्त्यावर नागरिक आणि पोलीस अशी चालणारी हुज्जत कमी होईल.

नागरिकांनी देखील पोलिसांना अशा बाबतीत मदत करावी. जर एखादा वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्याचा फोटो आणि माहिती पोलिसांना दिल्यास तात्काळ पोलीस संबंधित नागरिकांच्या तक्रारीला प्रतिसाद देतील. वाहन चालकाची तक्रार आल्यास त्याला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले जाईल, त्याने केलेली चूक सांगितली जाईल. जर संबंधित चालकाने चूक मान्य नाही केली तर त्याला पुरावे दाखविण्यात येतील. तरीही चालकाने मान्य केले नाही तर त्याच्यावर पोलिसांकडून खटला दाखल केला जाईल.

वाहतूक व्यवस्थेसाठी सुरुवातीला दोनच टीम काम करणार आहेत. एक टीम केवळ उलट्या दिशेने येणा-या वाहनांवर कारवाई करेल. तर दुसरी टीम डबल पार्किंग करणा-यांवर कारवाई करेल. डबल पार्किंग करताना अधिकारी संबंधित नागरिकांना सूचना देतील. दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास वाहनांचे नंबर घेऊन त्यांच्यावर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अवैध वाहतूक करणा-या वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. चालकांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येतील.

रस्त्यांची संख्या, गुणवत्ता आणि वाहतुकीची शिस्त या तीन बाबी वाहतुकीसाठी महत्वाच्या आहेत. रस्त्यांची संख्या आणि गुणवत्ता या दोन गोष्टी माझ्या हातात नाहीत, पण वाहतुकीची शिस्त पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील संपूर्ण कार्यक्षेत्रात दिसणारच असे ठाम मत देखील आयुक्त पद्मनाभन यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत येणारे कार्यक्षेत्र खूप मोठे आहे. त्याप्रमाणात मनुष्यबळ आणि अन्य सर्वच बाबी अतिशय कमी आहेत. पण कमी असलेल्या बाबींचे भांडवल करून शांत न बसता कमी संसाधनांमध्ये चांगले प्रशासन कसे करता येईल यावर माझा भर असणार आहे. त्यासाठी आम्ही तीन महिन्यांचे टार्गेट ठेवले आहे. या वेळेत चांगली कामगिरी लोकांना जाणवेल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.