Hall Of Fame 2020 : जॅक कॅलिस, झहीर अब्बास व लिसा स्थळेकर यांच्या यावर्षीच्या हॉल ऑफ फ़ेम मध्ये समावेश

लिसा स्थळेकर यांचा जन्म पुणे शहरातील असून ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली होती.

एमपीसी न्यूज – दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस, पाकिस्तानचे माजी दिग्गज फलंदाज झहीर अब्बास आणि जन्माने पुण्याची असलेली ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार लिसा स्थळेकर यांचा आयसीसीच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या हॉल ऑफ फ़ेम मध्ये समावेश करण्यात आला आहे. रविवारी आयसीसीच्या व्हर्च्युअल कार्यक्रमात तिन्ही दिग्गज खेळाडूंना हा सन्मान देण्यात आला.

जॅक कॅलिसने दक्षिण आफ्रिकेकडून 166  कसोटी, 328 वन-डे आणि 25 T20 सामने खेळले आहेत. 1995 ते 2014  या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत कॅलिस हा आपल्या अष्टपैलू खेळीसाठी ओळखला जायचा. कसोटीत 13 हजार 289 तर वन-डे क्रिकेटमध्ये 11 हजार 579 धावा खात्यात जमा असलेल्या कॅलिसने अनुक्रमे 292  आणि 273 बळी घेतले आहेत. कसोटी आणि वन-डे मध्ये 10 हजारपेक्षा जास्त धावा आणि किमान 250 बळी घेणारा कॅलिस हा एकमेव खेळाडू होता.

याव्यतिरीक्त ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल लिसा स्थळेकरचंही कौतुक करण्यात आलं. लिसाने ऑस्ट्रेलियन संघाकडून 8 कसोटी, 125 वन-डे आणि 54 T20 सामने खेळले आहेत. याचसोबत आपल्या काळात आशियाचे ब्रॅडमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झहीर अब्बास यांचाही सन्मान करण्यात आला. पाकिस्तानकडून 78 कसोटी आणि 62 वन-डे सामने खेळणारे अब्बास हे आपल्या बहारदार फलंदाजीसाठी ओळखले जायचे.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.