जलदिंडी.. प्रवाह जलसाक्षरतेचा, पर्यावरण रक्षणाचा..

भलतेणेंसीही मेळु । पाणिया ऐसा ढाळु ।। 
ज्ञानदेवांची जलनीती

ज्ञानदेवांनी जलनीतितील एक महत्त्वाचा सिद्धांत सांगितला आहे. याचा अर्थ पाणी सर्वांबरोबर जमवून घेते. पाणी संवेदनशील असून ते कोणाचेही वाईट करीत नाही. पाण्याला कोठेही ठेवले तरी ते त्यांत सामावून जाते. पाणी अथवा नदीतील पाण्याचा प्रवाह कसाही वेडावाकडा खडकांतून वाहत जाताना तो सरळ जातो. ही सरळता सक्रिय असते.

मानवाने पाणी प्यायल्यानंतर अथवा वृक्षाच्या मुळाशी गेल्यांनतर ते जिरून जाते, त्यामध्ये सामावून जाते. पाण्याची ही समरसता जगण्याचा महान अर्थ सांगून जाते. चंद्राची शीतलता तसेच सूर्याची तेजस्विता दोन्ही आरोग्यास उपायकारक असून यांना एका ठिकाणी आणण्याचे काम पाणी करीत असते. शीतल पाण्याने तहान भागते, तसेच गरम पाण्याने घसा बरा होतो. अशा रीतीने पाण्याची निरपेक्षता माणसाला बरेच काही शिकवून जाते.  वेळ पडल्यास माणूस किंवा कोणालाही पाण्याबरोबर जमवून घ्यावे लागते. पुराणात ‘लोकजनन्य: नदय:’ असे संस्कृत वाक्य आहे. म्हणजे नदीचा गौरव करून नदीला लोकमाता म्हटले आहे.

पण, आज चित्र नेमके उलटे दिसते. परिस्थिती झपाट्याने बदलत चालली आहे. याला लोकसंख्येचा विस्फोट, औद्योगीकरण, पाश्चात्य जीवनशैलीचे अंधानुकरण व अंधश्रद्धा असे अनेक घटक कारणीभूत आहेत. आजच्या नदीचे चित्र व सुमारे चाळीस वर्षांपूर्वीचे चित्र यात जमीन-अस्मानाइतका फरक आहे. ज्या नदीस आपण माता, आई म्हणतो, ती आता आजारी झाली आहे. तिच्या या अवस्थेस आपली पिढीच कारणीभूत आहे. आज गावोगावच्या नद्या सांडपाण्याच्या गटारी झालेल्या दिसतात. यात विज्ञानाची, प्रगतीची गती व पर्यावरण समतोल राखण्यास मानवाला जमलेले नाही. त्यामुळे विज्ञान – शाप की वरदान असा प्रश्न पडू लागलेला आहे. या विज्ञानामुळे मानवाला लाभलेली प्रगल्भ मानसिकता त्याला नीट वापरता आली नाही.त्यामुळे देशातील या नद्यांची अशी दारूण अवस्था झाली आहे. भीमा, गोदावरी, चंद्रभागा, इंद्रायणी, कृष्णा, कावेरी इतर सर्व नद्या यांचे पाणी व पात्रे आटत चालली आहेेत.

मासे, खेकडे अथवा कुठलाही जलचर जीव जगू शकत नाही असे विषारी दुर्गंधयुक्त पाण्याचे प्रवाह वाढत चालले आहे. काल म्हणजे वीस-पंचवीस वर्षांपूर्वी वाहत्या शुद्ध नद्यांची अवस्था बदलून कारखाने व शहरातील सांडपाणी अशी नद्याची उगमस्थान झालेली आढळतात तर यापुढे अशा काळजी न घेतल्याने नदीचे भेसूर परिस्थितीचे गांभीर्य कमालीचे विदारक बनेल, याबद्दल तिळमात्र शंका नाही. वरील परिस्थितीचे स्वरूप बदलणे ही आज काळाची गरज आहे. या सर्वांचे गांभीर्य लक्षात घेऊन भविष्यकाळातील पिढ्यांकरिता नदी वाचविण्यासाठीची गरज डॉक्टर विश्वास येवले ओळखली व जलदिंडीची अभिनव अशी संकल्पना तयार केली व ती प्रत्यक्षात आणली गेली. 16 वर्षांपासून याची यशस्वी अंमलबजावणी होत आहे.

याच विचारांनी प्रेरित होउन पिंपरी चिंचवड शहरातून वाहणारी, उद्योग नगरीची जीवनदायिनी असलेल्या पवना नदीसाठी काही समविचारी व सामाजिक भावनांची जाणीव असणारे जलमित्र एकत्र आले. मार्च 2010 साली पहिल्या पवना जलमैत्रीचे आयोजन करण्यात आले. सुमारे 22 ते 25 जलमित्र एकत्र येऊन पवना नदीच्या उगमस्थानाचा शोध सुरू झाला. लोणावळ्यापासून सुमारे 10 ते 12 किमी अंतरावर तिकोना किल्ला असून, आटवन गावाजवळ नदीचा काठ संपतो व नंतर 8 ते 10 कि.मी. गिर्यारोहण करीत सोनजाई देवीच्या मंदिराजवळ नदीचा उगम आढळला. उगमापाशी नदीचे रूप व पाणी अतिशय सुंदर, स्फटिकासारखे होते. उगमस्थानापासूनचा प्रवास अवर्णनीय आहे.
जलदिंडी एक बिनभिंतीची शाळा…..
केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार,
शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार’

मोरेश्वर रामचंद्र पराडकर तथा मोरोपंत, मयूर पंडित, मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवीचे प्रसिद्ध वाक्य. प्रवासाने व विविध ज्ञानी लोकांबरोबर कालावधी व्यतीत करून माणसाला समाजातील जे काही उदंड, उदात्त आहे, ते समजण्यास मदत होते. देशाटनाने सृष्टीची रहस्ये कळतात. समर्थ रामदास स्वामींना पण असेच वाटते व ते लिहतात-

सृष्टीमध्ये बहु लोक परिभ्रमणाने कळे कौतुक चुकोनी उदंड आढळते

जलदिंडी बरोबर प्रवास करतानाही असेच अनुभव येतात. आपल्या सभोवतलाचा भूभाग लक्षात येतो. कारण आपल्या संस्कृती व लोकवस्त्या नदी काठावर विकसीत झाल्या आहेत. सभोवतालच्या भूभागाबरोबर मातीची ओळख, मातीचा रंग, पोत, मातीचे विविध प्रकार लक्षात येतात. सभोवतालची पिके, फळे तसेच झाडे यांचे ज्ञान प्राप्त होते. शालेय जीवशास्त्रात अजून वेगळे काय आहे व त्याचे व्यावहारिक प्रत्यक्ष ज्ञान जलदिंडीच्या प्रवासात अनुभवता येते. अजून पुढचा विचार केला तर एखादा माहीतगार मिळाला तर स्थानिक औषधी वनस्पतींचा अभ्यासही करता येतो. म्हणजे आयुर्वेद शास्त्रातील एखादा भाग अनुभवता येतो. भौतिक शास्त्राचा जर विचार केला तर जेव्हा जलदिंडीच्या नौका पाण्यावर प्रवास करतात, त्यावेळी बायोन्सी फोर्स म्हणजे काय हे अनुभवता येइल. पवना जलदिंडीच्या प्रवासात मावळ खोऱ्यातील भौगोलिक प्रदेशात वावरताना इतिहासातही शिरता येते. तेथे असणारे तिकोना किल्ला, लोहगड किल्ला, तुंग किल्ला या ऐतिहासिक वास्तू या ऐतिहासिक वास्तू अभ्यासता येतील. अशाप्रकारे जलदिंडीच्या प्रवासात शैक्षणिक अभ्यासक्रमातील अनेक विषय अनुभवता येतील व शाळाच्या भिंती ओलांडून अभ्यास शिकता येइल. शासनादेखील याची दखल घेऊन ८वी इयत्तेच्या बालभारतीमध्ये जलदिंडी हा धडा अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे.

कार्यक्रमाचे नियोजन :
शुक्रवार दिनांक 20 डिंसेबर 2019 शुक्रवार रोजी जलशुद्धीकरण केंद्रापासून सकाळी 7 वाजता निघून सकाळी 10 पर्यंत पवनानगर घाटापर्यंत जाणे, या ठिकाणाहून नदीपूजन करून जलमैत्रीस आरंभ व सायंकाळी 5.00 वाजता साळुंब्रे गावात पवनामाई महोत्सवामध्ये सामील होणे. रात्री मुक्काम.

शनिवार दिनांक 21 डिसेंबर 2019 शनिवार रोजी साळुंब्रे सकाळी 10 वाजता निघून 12 वा पर्यंत रावेतला पोहोचणे. जेवणानंतर दुपारी 2.00 पर्यंत मोरया गोसावी समाधीस्थळ चिंचवड घाटापर्यंत येणे, सायंकाळी ४.३० वाजता सांगता समारंभ.

आपण ही काळाची गरज ओळखून या अभियानात सामील होऊन आपली जीवनदायिनी पवना नदीच्या समस्या समजवून घेऊया. या अभियानात सहभाग घेण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे, यासाठी संपर्क व्हाॅट्स अप नंबर ७७२०००५६१० व ८९७५७ ६५७६३.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.