Hinjawadi : कासारसाई घटनेतील नराधमांना फाशी द्या

पीडित मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरीत कँडल मार्च

एमपीसी न्यूज – हिंजवडीतील कासारसाई येथे गेल्या आठवड्यात दोन अल्पवयीन शाळकरी मुलींवर बलात्कार झाल्याची घटना घडली. घटनेतील आरोपी नराधमांना फाशी झालीच पाहिजे. तसेच तज्ज्ञ सरकारी वकीलाची नियुक्ती करुन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. याचबरोबर पीडित कुटुंबीयांना लवकरात लवकर अर्थिक मदत देण्यात यावी, यासाठी पिंपरी-चिंचवड परिसरात कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. 

हिंजवडी, कासारसाई येथील दूर्दैवी घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला. तर दुसरी मुलगी औषधोपचारार्थ रुग्णालयात दाखल आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी अन्याय अत्याचार विरोधी पिंपरी-चिंचवड कृती समितीच्या वतीने पिंपरीत कँडल मार्च व श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी घटनेचा निषेध करुन आरोपींना फाशीची मागणी केली.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथून गुरुवारी सायंकाळी गोकूळ हॉटेल, शगुन चौक, कराची चौक, रिव्हर रोड, झुलेलाल मंदिर येथील पवना घाट येथे कँडल मार्चचे आयोजन केले होते. यावेळी घाटावर या घटनेत मृत्यू झालेल्या मुलीला श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजली सभेत नगरसेविका योगिता नागरगोजे, केशव घोळवे, दीपक नागरगोजे, सारिका चव्हाण, नीता परदेशी तसेच पिंपरी -चिंचवड मधील विविध सामाजिक संघटनांचा सहभाग होता.

ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी साखर कारखाना परिसरात कायमस्वरूपी साखर शाळा सुरु करण्यात याव्यात. तसेच ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ जाहीर करावे. या महामंडळांतर्गत मुलांच्या शिक्षणाची व कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी उपस्थितांनी यावेळी केली.

”हिंजवडी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेतील पीडित मुलींना शासनाने लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अन्यथा अशा घटना घडत राहतील. तसेच, हिंजवडी प्रकरणातील केस ही जलदगती न्यायालयात चालवावी.”

– योगिता नागरगोजे, नगरसेविका, पिंपरी चिंचवड महापालिका

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.