Happy Birthday Ajit Pawar: अचूक निर्णय घेणारे धडाकेबाज नेतृत्त्व- अजितदादा

Happy Birthday: Ajit Pawar is the leader who makes the right decisions कोणताही विलंब न लावता पटापट निर्णय घेऊन समोरील समस्या लवकरात लवकर सोडवण्यावर त्यांचा भर असतो.

एमपीसी न्यूज- आक्रमक, धाडसी, दूरदर्शी आणि विकासाभिमुख नेतृत्व याचे दुसरे नाव म्हणजे अजितदादा पवार. सत्ता असो किंवा नसो, त्याच तडफेने आणि उत्साहाने जनतेची प्रश्ने सोडवण्याची धमक उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्यात आहे. दादांनी वेळोवेळी आपल्या नेतृत्त्वगुणाची आणि अचूक निर्णय क्षमतेची चुणूक राज्याचा गाडा चालवताना दाखवली आहे. समस्या कोणतीही असो तिचे रामबाण उत्तर अजितदादांकडे असणारच.

आज पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा जो विकास झाला आहे, त्याचे शिल्पकार अजितदादा हेच आहेत, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पण जेव्हा-केव्हा या दोन शहरांच्या विकासाची चर्चा होते. तेव्हा सर्वांत प्रथम प्रत्येकांच्या तोंडी नाव येते ते अजितदादांचे. पिंपरी-चिंचवडच्या पायाभूत विकासाची मुहूर्तमेढ दादांनी रोवल्यामुळेच आज राज्यात सर्वाधिक विकसित आणि पुढारलेल्या शहरांमध्ये या शहराच्या नावाचा समावेश होतो.

सध्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला वेढले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडला या कोरोनारुपी राक्षसाने आपल्या बाहुपाशात कवटाळले आहे. या प्रतिकूल परिस्थितीतही अजितदादा अत्यंत संयमाने अचूक निर्णय घेताना दिसत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेतील 4 अधिकाऱ्यांची शहरात नेमणूक केली आहे. प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली आहे. स्वतः वारंवार बैठका घेऊन कोरोनावर कसे नियंत्रण मिळवता येईल यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

औद्यौगिक नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील यंत्रे लॉकडाऊन काळात बंद पडली होती. याचा परिणाम या उद्योगधंद्यावर अवलंबून असलेल्यांवर झाला. अनेकांच्या हातातील कामे चालली होती. त्यावेळी येथील उद्योगधंदे सुरु होण्याची आवश्यकता होती. अजितदादांनी त्वरीत याची दखल घेत पिंपरी-चिंचवडला रेड झोनमधून काढून उद्योगधंदे सुरु करण्याची मुभा दिली. येथील यंत्रे पुन्हा सुरु झाली. अजितदादांच्या या निर्णयामुळे उद्योगांसमोर आलेले मोठे संकट टळले.

कोणताही विलंब न लावता पटापट निर्णय घेऊन समोरील समस्या लवकरात लवकर सोडवण्यावर त्यांचा भर असतो. याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वी दिसून आला. गेल्या काही दिवसांपासून सारथी संस्थेवरुन वाद सुरु होता. यासाठी अनेक आंदोलने झाली. पण ज्यावेळी अजितदादांनी हा प्रश्न आपल्या हाती घेतला. तेव्हा त्यांनी एका बैठकीतच यावर तोडगा काढत सारथी संस्थेसाठी 8 कोटींच्या निधीची घोषणा केली.

अजितदादा इतर नेत्यांप्रमाणे केवळ घोषणेवरच थांबले नाहीत. त्यांनी घोषणेच्या दोन तासांत हा निधी सारथी संस्थेला उपलब्ध करुन दिला. तसा निरोप त्यांनी सारथी संस्थेला कळवलाही. यावरुन पुन्हा एकदा त्यांच्या त्वरीत निर्णय घेण्याच्या कार्यशैलीचे कौतुक झाले. प्रशासनावर प्रचंड पकड आणि ताकदीचा नेता अशी ओळख असलेला हा नेता प्रत्येकाला हवाहवासा असा आहे.

एमपीसी न्यूजच्या वतीने अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.