Happy Birthday Karishma: करिश्माने ‘निशा’ साकारण्यासाठी प्रथम का बरं दिला होता नकार?

Happy Birthday Karishma: Why did Karishma refuse to do the roll of 'Nisha'?

एमपीसी न्यूज – कपूर खानदानातील पहिली मुलगी जिने बॉलिवूडमधे पदार्पण केले. नुसते पदार्पणच नव्हे तर आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने रसिकांवर मोहिनी घातली ती म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर. आज करिश्माचा वाढदिवस, त्या निमित्त तिला हार्दिक शुभेच्छा!

आई बबिता आणि वडील रणधीर कपूर यांचा मिक्स फेसकट असलेल्या करिश्माने एक काळ गोविंदासोबत हिंदी पडद्यावर धुमाकूळ घातला होता. चुलबुली, नटखट देखणी करिश्मा आणि मिष्किल गोविंदा ही जोडी रसिकांनी चांगलीच डोक्यावर घेतली. तिच्या अनेक गाजलेल्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक म्हणजे निर्माते आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांचा ‘दिल तो पागल है’. शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट त्या काळी तुफान गाजला होता.

या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची भूमिका विशेष गाजली. मात्र या चित्रपटात काम करण्यासाठी करिश्माने प्रथम नकार दिला होता. विशेष म्हणजे माधुरी दीक्षित असल्यामुळे तिला या चित्रपटात काम करायचं नव्हतं असं म्हटलं जातं.

‘दिल तो पागल है’ मध्ये करिश्माने राहुलच्या (शाहरुख खान) मैत्रिणीची भूमिका साकारली होती. निशा असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव होतं. राहुलवर मनापासून प्रेम करणारी पण पूजामुळे चिडलेली पण नंतर त्याग करणारी अशी ही निशा प्रेक्षकांची लाडकी झाली होती. शेवट गुडी गुडी असणा-या या चित्रपटात निशाला तिचा जीवनसाथी अक्षयकुमारच्या रुपाने भेटतो.

या चित्रपटामध्ये शाहरुख आणि माधुरी मुख्य भूमिकेत होते. त्याकाळी माधुरी आणि करिश्मा दोघीही लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यामुळे एकाच चित्रपटात माधुरीसोबत काम करणं आणि त्यातही छोटेखानी भूमिका साकारणं करिश्माला फारसं पटलेलं नव्हतं. त्यामुळे तिने या चित्रपटाला नकार दिला होता. तिच्या नकारानंतर यश चोप्रा यांनी जुही चावला, मनीषा कोइराला, रविना टंडन, काजोल या अभिनेत्रींना निशाच्या रोलसाठी विचारणा केली होती. मात्र कोणीही माधुरीसोबत सेकंड लीड करायला तयार नव्हतं.

अनेक अभिनेत्रींनी नकार दिल्यानंतर यश चोप्रा यांनी पुन्हा एकदा करिश्माला या भूमिकेविषयी विचारलं. त्यांनी केवळ विचारलंच नाही, तर तिची समजूतही घातली. त्यानंतर करिश्मा या चित्रपटात काम करण्यास तयार झाली. मात्र निशा ही भूमिका तुफान गाजली. आजही या भूमिकेमुळे करिश्माच्या नावाची चर्चा होताना दिसते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.