Happy Birthday Neetu Kapoor : एकेकाळी नीतू ऋषीला प्रेयसीला पत्र लिहिण्यासाठी मदत करीत

Once upon a time, Neetu was helping to write a letter to his beloved

एमपीसी न्यूज – एकेकाळी त्यांच्यासारखी आपली जोडी जमावी म्हणून टीनएजर मुलगा मुलगी देवाकडे प्रार्थना करत असत. बॉलिवूडमधील मोस्ट सक्सेसफुल आणि आदर्श जोडी म्हणून ऋषी आणि नीतू कपूर यांच्याकडे पाहिले जाते. आज नीतू कपूर यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

दुर्दैवाने ऋषी आज आपल्यात नाहीत. काही महिन्यांपूर्वी कॅन्सरने त्यांचा मृत्यू झाला. ऋषी यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पण आपल्या आईला वडिलांची उणीव भासू नये म्हणून ऋषी आणि नीतू यांची दोन्ही मुले म्हणजे रणबीर आणि रिधीमा यांनी नीतू यांचा वाढदिवस साजरा केला. नीतू कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा चाहत्यांकडून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. यातच एकमेकांच्या प्रेमात पडण्यापूर्वी नीतू कपूर या चक्क ऋषी कपूर यांच्या प्रेयसीला लव्हलेटर पाठविण्यासाठी मदत करायच्या असं सांगण्यात येत आहे.

‘जनसत्ता’च्या माहितीनुसार, एकेकाळी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांच्याकडे पाहिलं जायचं. हे दोघेही चाइल्ड आर्टिस्ट होते. नीतू यांचे बालकलाकार म्हणून अनेक चित्रपट आहेत. त्यात ‘दो कलिया’ हा प्रसिद्ध चित्रपट आहे. त्यात नीतू यांनी ‘बेबी सोनिया’ या नावाने काम केले होते. आणि मुख्य म्हणजे डबल रोल केला होता. तसेच ऋषी तर ‘कपूर खानदानका लडका’ होते. युवा ऋषीचा ‘बॉबी’ खूपच फेमस झाला होता.

नंतर ऋषी आणि नीतू यांनी ‘कभी कभी’मध्ये एकत्र काम केले. त्यावेळी त्यांची फक्त मैत्री होती. त्यामुळे हे दोघंही एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्ट शेअर करत होते. यामध्येच ऋषी कपूर यांच्या गर्लफ्रेंडविषयीदेखील नीतू यांना माहित होतं. विशेष म्हणजे अनेक वेळा ऋषी कपूर यांना गर्लफ्रेंडला प्रेमपत्र लिहिण्यासाठी नीतू  मदत करत असत. इतकंच नाही तर त्यांनी स्वत: काही प्रेमपत्र ऋषी कपूर यांना लिहून दिली होती.

असं म्हटलं जातं की त्याकाळी ऋषी  यास्मीन मेहता हिला डेट करत होते. त्याचवेळी डिंपल कपाडिया आणि ऋषी कपूर यांच्या अफेअरविषयी अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. हा दुरावा दूर करण्याचा नीतू प्रयत्न करत होत्या. मात्र यात  ऋषी  आणि नीतू यांची जवळीक वाढली आणि तेच एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं आणि त्यानंतर नीतू यांनी चित्रपटसृष्टीत काम करणे थांबवले. पुढे अनेक वर्षांनी त्यांनी ऋषी बरोबर ‘दो दुनी चार’ यासारखे काही चित्रपट केले. पण वैवाहिक आयुष्यात अनेक चढउतार आले तरी या दोघांनी एकमेकांना कायम साथ दिली. काळानेच त्यांच्यात दुरावा निर्माण केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.