BNR-HDR-TOP-Mobile

नवीन गृहखरेदीसाठी शुभ मुहूर्ताचा गुढीपाडवा

(स्मिता जोशी )

एमपीसी न्यूज- नुकतीच होळी साजरी करुन थंडीला समारंभपूर्वक निरोप दिला. आता उन्हाळा जोर धरु लागला आहे. वातावरणातील उष्मा तापू लागला आहे. भारतीय पंचांगानुसार सध्या वसंत ऋतू सुरु आहे. बाहेर सुरु असणारे कोकिळेचे कूजन, झाडांना फुटलेली नवीन पालवी, संध्याकाळच्या वेळी येणारी वा-याची गार झुळूक आपल्याला थंडावा देऊन जाते. मात्र दुपारच्या तप्त उन्हात आपल्याला आस लागते ती सावलीची. आणि ही सावली देण्यासाठी आपले बाहू पसरुन पुढे येते ते आपले घरकुल. कशी गंमत असते ना हिवाळ्यातल्या बोच-या थंडीपासून आपले रक्षण करणारे, उन्हाळ्यातल्या तापणा-या उन्हापासून देखील रक्षण करणारे, वादळ, वारा, पावसापासून रक्षण करणारे आपले घर एकच असते. हे तीनही ऋतू पूर्णपणे भिन्न. मात्र या तिघांपासून आपल्याला सावरणारे असते ते आपले प्राणप्रिय घरकुल. हिवाळ्यात ऊब देणारे, उन्हाळ्यात शीतलता देणारे आणि पावसापासून सावरणारे घर एकच असते. मात्र त्याची कामे प्रत्येक ऋतूत वेगवेगळी. कोणाचे स्वप्नातले छोटेसे घरकुल, कोणाचा भलामोठा महाल, कोणाची छोटीशी झोपडी तर कोणाचा सगळ्या गरजा एकाच छताखाली भागवणारा सर्वसोयींनी सुसज्ज असा फ्लॅट. घराचे नाव कोणते पण असो पण त्यात राहणा-या लोकांमुळे त्याचे रुप ठरत असते. कवयित्री विमल लिमये यांच्या प्रसिद्ध कवितेप्रमाणे, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम, जिव्हाळा नकोत नुसती नाती. फक्त चार भिंतीचे आहे म्हणून ते घर ठरत नाही. किंवा चंद्रमौळी झोपडी आहे म्हणून ती कमी प्रतीची होत नाही.

आणि अर्थातच गृहखरेदीचा उत्तम मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. भारतीय संस्कृतीत साडेतीन मुहूर्तांना फार मोठे महत्व आहे. गुढीपाडवा, विजयादशमी अर्थात दसरा, अक्षय्यतृतीया हे तीन पूर्ण मुहूर्त व बलिप्रतिपदा हा अर्धा मुहूर्त हे चारही दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी महत्वाचे मानले जातात. त्यातही पाडव्याला जास्त महत्व असते. कारण हा वर्षारंभाचा दिवस असतो. हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते. त्याला कारणेही अनेक आहेत. असे मानले जाते की याच दिवशी रावणाचा वध करुन, सीतेला त्याच्या तावडीतून सोडवून श्रीराम अयोध्योला परत आले. आपला राजा परत आल्याने अयोध्यावासीयांसाठी तो सणच होता. त्यांनी गुढ्या, तोरणे उभारुन राम, लक्ष्मण, सीतेचे भव्य स्वागत केले. तोच हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. जगाचा निर्माता म्हणून ज्याला मानले जाते त्या ब्रह्मदेवाने पाडव्याच्या दिवशीच विश्वाची निर्मिती केली असे मानले जात. शालिवाहन शकाची सुरुवात देखील याच दिवशी झाली. शालिवाहन राजाने शकांचा पराभव करुन आपले राज्य स्थापन केले तोच हा दिवस. त्यामुळे या दिवसापासून नवीन शालिवाहन शकाची सुरुवात होते. या दिवशी प्रामुख्याने गृहखरेदी, वाहनखरेदी, सोनेचांदीच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. अर्थात त्याचे कारणही तर्कशुद्ध आहे. भारत हा पूर्वापार कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे पाडव्याच्या आसपास म्हणजे वसंतऋतूच्या सुरुवातीला रब्बीचे नवे पीक हाती आलेले असते. त्यामुळे शेतक-याच्या हातात पैसा असे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची खरेदी करणे त्याला शक्य असे. म्हणून मग पाडव्याच्या दिवशी नवीन खरेदी करण्याची प्रथा पडली आणि ती पुढेही सुरु राहिली.

त्यामुळे मग पाडव्याच्या मुहूर्तावर गृहखरेदीला मोठी चालना मिळते. तसेच आजकाल गुंतवणूक म्हणून देखील घरखरेदी करण्यासाठी प्राधान्य दिले जाते. सध्या पिंपरी चिंचवड आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर विविध सोयीसुविधा असलेले, वेगवेगळ्या प्रकारचे अत्याधुनिक व सर्वसामान्यांना परवडतील असेदेखील गृहप्रकल्प उभे राहत आहेत. काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. पिंपरी चिंचवडचे क्षेत्र आता विस्तारले असून नागरी सोयीसुविधा येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे येथे गुंतवणूक करण्यास नागरिक उत्सुक आहेत. हिंजवडीमुळे आयटीक्षेत्राची निर्मिती झाली. तसेच पिंपरी चिंचवडची औद्योगिकनगरी ही ओळख तर पहिल्यापासूनच आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या विविध भागातील लोक येथे वास्तव्यासाठी येतात. पुण्याची वाढ आता थोड्या प्रमाणात होत आहे. पण पिंपरी चिंचवडला अजूनही विस्तारासाठी जागा आहे. आणि नागरी सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध असल्याने येथे घरे घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. याचाच फायदा गृहविकसकांना होत असून मागील काही काळाच्या मंदीनंतर आता हे क्षेत्र जोर धरु लागले आहे. चोखंदळ ग्राहकामुळे नवीन शैलीतील घरे बांधण्याकडे कल वाढला आहे. प्रधानमंत्री आवास योजना, मध्यमवर्गीयांसाठी घरे, म्हाडा या विविध योजनांमुळे आता स्वत:च्या घराचे स्वप्न सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या घरांच्या खरेदीला आता मोठ्या प्रमाणावर चालना मिळत आहे.

घर दोघांचे घरकुल पाखरांचे, ये तेरा घर ये मेरा घर, तुझ्यामाझ्या संसाराला आनी काय हवं या सारख्या गाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे घरकुलाचे सुंदर स्वप्न रेखाटणारी घरं. खरंच अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांसाठी माणसाचे सगळे आय़ुष्य पणाला लागते. पूर्वीच्या काळी मोठेमोठे वाडे वर्षानुवर्षे टिकून राहात असत. तिथे कित्येक पिढ्या नांदत असत. पण आज आई, वडील आणि मुलांच्या त्रिकोणी अथवा चौकोनी कुटुंबाची गरज वेगळी आहे. त्यामुळे मागणी तसा पुरवठा या न्यायानुसार आताची घरेदेखील छोटी झाली आहेत. पण अजूनही त्यातील जिव्हाळा कायम आहे. त्याच्या गरजा थोड्या वेगळ्या असतील, पण मनुष्याच्या नातेसंबंधाची तीच सुंदर गुंफण आजही पाहायला मिळते. आणि मग ते घरदेखील सुखासमाधानाने भरुन जाते. डोक्यावरचे छप्पर अबाधित असल्याने कुटुंबदेखील खुषीत असते. आपलं घर हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आपण आपलं आयुष्य जिथे सुखासमाधानाने व्यतीत करतो त्या घराशी आपल्या अनेक आठवणींचा सुंदर गोफ विणलेला असतो. त्या आठवणी कधी नाजूक असतात तर कधी सुखद तर कधी मनाबाहेर टाकण्यासारख्यादेखील असतात. मात्र घरात आल्यानंतर उबदार आठवणीच मनात रुंजी घालत असतात. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांची काही गोड, तिखट, कटू गुपिते घराने आपल्या जवळ जपलेली असतात. म्हणूनच आपले घर ते आपले घर, त्याला दुस-या कशाचीच नाही सर.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3