Wakad : हॉटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

Harassment of a married woman demanding money from maternal family to start a hotel business.

एमपीसी न्यूज – हॉटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच फ्लॅटचे पैसे भरण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत  विवाहितेचा छळ केल्याचा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही घटना सन 2019 पासून 5 सप्टेंबर 2020 या कालावधीत घडली.

पती नारायण नामदेव रोडगे (वय 35, रा. पुनावळे), सासरे नामदेव रामा रोडगे (वय 75), सासू कमल नामदेव रोडगे (वय 70), दीर कृष्णा नामदेव रोडगे (वय 48), जाऊ मोहिनी कृष्णा रोडगे (वय 40, सर्व रा. आवे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिडीत विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून आरोपी पतीने फ्लॅटचे पैसे भरण्यासाठी तसेच हॉटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली.

त्यासाठी फिर्यादी यांनी नकार दिला. नकार दिल्यामुळे पतीने विवाहितेला शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करून विवाहितेच्या वडिलांकडून दहा लाख रुपये घेतले.

त्यानंतर पुन्हा सर्व आरोपींनी विवाहीतेकडे पैशांची मागणी करून तिला शिवीगाळ व मारहाण करत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.