Harley Davidson exits India : कोरोनामुळे हार्ले डेव्हीडसन भारतातून गुंडाळणार गाशा

एमपीसी न्यूज – आपण रस्त्यावरुन जाताना अचानकपणे मोटरसायकलच्या सायलेन्सरचा तो टिपिकल फटफट असा आवाज आला तर नक्की वळून बघतोच. भरवेगात फटरफटर करत जाणा-या त्या दणकट बाइकवरुन आपली नजर हटत नाही. पण आता कोरोनाच्या लॉकडाऊनचा या उद्योगाला देखील जोरदार फटका बसला आहे. स्टायलिश आणि खास बाइकसाठी प्रसिद्ध असलेली हार्ले डेव्हिडसन ही बाईक कंपनी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.

हार्ले डेव्हिडसनची बाईक, तिचा लुक कुणालाही मोहात पाडेल असाच आहे. पण कोरोनातील मंदीमुळे भारतातून या कंपनीने गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे या कंपनीत काम करणाऱ्या ७० कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरीही गमवावी लागली आहे. कोरोनाकाळात विक्री कमी झाल्याने हार्ले डेव्हिडसन या कंपनीने भारतातली कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

लाखो रुपयांच्या किंमतीच्या या बाइक घेणे ही तरुणाईची क्रेझ होती. पण मागील आर्थिक वर्षात हार्ले डेव्हिडसन या कंपनीने भारतात २५०० पेक्षा कमी बाईक विकल्या होत्या. भारतातली या कंपनीची ही सुमार कामगिरी ठरली. फेब्रुवारी २०१८ या आर्थिक वर्षात हार्ले डेव्हिडसन या कंपनीने ३४०० पेक्षा जास्त बाईक विकल्या होत्या. मागील तीन ते चार वर्षांपासून या कंपनीचा चांगला व्यवसाय होता. मात्र मागील आर्थिक वर्षापासून या कंपनीला अडचणी येत होत्या.

हार्ले डेव्हिडसन ही कंपनी इंडियन, बेनेली, कावासाकी, डुकाटी यासारख्या कंपन्यांना टक्कर देतच होती. तसच यामाहा, सुझुकी आणि होंडा यांच्या प्रिमियम रेंजच्या बाईक्ससोबतही स्पर्धा करत होती. आता ही कंपनी भारतातून गाशा गुंडाळते आहे. करोनाचं संकट आणि लॉकडाउन यामुळे विक्रीवर झालेला प्रचंड परिणाम हे यामागचं सर्वात मोठं कारण आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.