Article By Harshal Alpe : अजिंक्य नेहमीच अजिंक्य राहाणे !

एमपीसी न्यूज – काल झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामधील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने दिलेले 70 धावांचे आव्हान भारताने दोन गडी गमावून पार केले. यामध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेने महत्त्वाची भूमिका बजावली. याच विषयावरील हर्षल अल्पे यांचा आजचा लेख….


…आणि अखेर आपण ऑस्ट्रेलिया मध्ये जिंकलो, आणि ते ही समाधानकारकरित्या, हे विशेषच कौतुक !

तस म्हंटलं तर पहिल्या कसोटीत आपण विशेषत: आपल्या गोलंदाजांनी आपल्याला विजयाच्या अगदी जवळ नेलेच होत की , मात्र आपल्या फलंदाजांनी क्रिकेट हा खेळ किती बेभरवशाचा आहे , हे सिद्ध करण्याचा चंगच बांधला आणि तो 36 धावात बाद होऊन पूर्णही केला… ते एक वाईट असं स्वप्न होत जे भरदिवसा पडलं होतं, या वेळी जेव्हा आपले फलंदाज खेळायला आले तेव्हा अनेकांनी घरातल्या घरात देवघरापाशी जाऊन देवाला जागंही केलं असेल. निदान 36 च्या पुढे जाऊ दे , आणि 3 आकडी संख्या आपण गाठू दे रे देवा, असंच ते मागणं होतं …

या कसोटीत आपला कर्णधार ही बदलेला, कर्णधार विराट कोहली काही खाजगी कारणासाठी आपला घरी परतला , “अब तुम्हारे हवाले वतन साथीयो” म्हणतच त्याने ऑस्ट्रेलियाहून भारतात येण्यासाठी विमान पकडले… दुसरं म्हणजे अजिंक्य आपले नाव अनेक वेळेला बोलून जप करत असला पाहिजे, त्याच तपश्चर्येचं फळ त्याला मिळालं, नाही तर बघा ना, आजपर्यंत त्याने शतक केलेली एक ही मॅच आपण कधीच हरलो नाही, या ही मॅच मध्ये त्याच ते “शतक” झालं , आणि आपण सामना खिशात घातला…

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना हा एक धक्का आहे, अरे, हेच ते फलंदाज होते ना थोड्या फार फरकाने, ज्यांना आपण 36 धावात गुंडाळलं होत , मग हे अचानक आपल्या त्या दर्जाच्या गोलंदाजीवर अचानक भागीदार्‍या कसे काय करायला लागले ? हे कोडं काही उलगडायला तयार नाही, विशेष उल्लेख म्हणजे शुभमन गिल नावाचा आणि आपली पहिली टेस्ट खेळणारा फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या त्याच गोलंदाजांना असे खेळवत होता, जसे की, यांच्या बरोबर हा नेहमीच गल्लीत खेळतो, पहिल्या आणि दुसर्‍या डावात त्याने मारलेले चौकार डोळ्यांचे पारणे फेडणारे होते, तीच गोष्ट मोहोम्मद सिराज नावाच्या जलद गती गोलंदाजाची, काय तो वेग आणि काय ती अचूकता ? निव्वळ अफाट, माझ्यासारख्या 90 च्या दशकात क्रिकेट पाहायला लागलेल्या लोकांचं ठीक आहे, पण आमच्या आधीच्या पिढ्या या निश्चितच आपल्या जलद गती गोलंदाजांचा पराक्रम बघून सुखावत असतील …

अजून एक उल्लेख म्हणजे रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जडेजाचा , हे दोघे ही जण जेव्हा एकाच संघातून दमदार खेळतात तेव्हा भारतीय संघाचा विजयी रथ कोणी ही रोखू शकत नाही, हेच पुन्हा एकदा मेलबर्न टेस्टने सिद्ध केलंय…

एकूण काय ? तर आपण जिंकलो आणि या मालिकेत बरोबरी साधली अजिंक्य राहाणेच्या संयमी आणि तितक्यात धूर्त नेतृत्वाखाली आपण जिंकलो, हेच मोठ वैशिष्ट्य.  या सांघिक विजयासाठी सर्वांनीच अफाट पराक्रम गाजवला या बद्दल कौतुक आहेच…

आता “ये दिल मांगे मोर” या बिरुदावलीप्रमाणे आता मालिका विजयाचा आनंद ही असाच जल्लोषात साजरा करायला आम्ही भारतीय लोक सज्ज आणि सिद्ध आहोत, इतकेच ….

धन्यवाद …

लेखक :
हर्षल आल्पे, तळेगाव दाभाडे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.