Pimpri : विद्यार्थ्यांनो चांगल्या विचारांकडे पाठ फिरवू नका – मकरंद टिल्लू

कौशल्य विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न; रोटरीचा संयुक्त उपक्रम

एमपीसी न्यूज – विचारांचे खतपाणी आपल्या मेंदूला द्यायला हवे. चांगले विचार खायला शिकलो तर त्यातून यशाची शिखरे पादाक्रांत करता येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगल्या विचारांचा सातत्याने पाठपुरावा करायला हवा. सर्व प्रकारची कौशल्ये आत्मसात करायला हवीत, असे मत हास्ययोग तज्ज्ञ मकरंद टिल्लू यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ चिंचवड, इनरव्हील क्लब ऑफ पिंपरी, रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवड आणि प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचा इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास कार्यशाळा 30 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली. या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मकरंद टिल्लू बोलत होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी, रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मयूर कलशेट्टी, इनरव्हील क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षा मनीषा समर्थ, प्राचार्य मनोहर चासकर, समन्वयक शिल्पागौरी गणपुले, अनंदीता मुखर्जी, मीना गुप्ता आदी उपस्थित होते.

मकरंद टिल्लू म्हणाले, “लहान-लहान कौशल्यांमधून व्यक्तिमत्व विकास आणि व्यक्तिमत्व विकासातून यशस्वी होता येते. चांगल्या विचारांकडे पाठ फिरवायची नाही. स्वतःच्या चुका लक्षात घेऊन त्या कमी करण्यासाठी प्रयत्न करा. विचारांमध्ये सकारात्मकता वाढवा. नेतृत्व गुणाचाही विकास साधण्याचा सल्ला टिल्लू यांनी विद्यार्थ्यांना दिला.

मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, “बारा दिवसांच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य निर्मिती आणि त्याचा विकास याबाबत शिबिरे राबविण्यात आली. प्रा. रामकृष्ण मोरे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयातर्फे वेळोवेळी राबविण्यात येणा-या उपक्रमांना रोटरी क्लब साथ देणार आहे. विद्यार्थ्यांची प्रगती, त्यांचे यश हाच रोटरीचा ध्यास आहे. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम यापुढील काळात देखील राबविण्यात येतील. कौशल्य विकास शिबिर आणि अवयवदान मोहिमेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.

प्राचार्य मनोहर चासकर म्हणाले, “रोटरीने कौशल्य विकास शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीचा विद्यार्थी नक्की फायदा घेतील. विद्यार्थी सातत्याने यशाचा ध्यास घेऊन प्रयत्नशील राहतील. त्यामुळे या गुंतवणुकीची फळे देखील आपल्याला विद्यार्थ्यांच्या यशामधून मिळतील. कौशल्य विकास शिबिर यावेळी फक्त एका विभागासाठी आयोजित करण्यात आले होते, पुढील काळात संपूर्ण महाविद्यालयात हे शिबीर राबविण्याचा मानस आहे”

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. नम्रता आल्हाट, प्रा. डॉ. आशुतोष ठाकरे, प्रा. रुपल वाघमारे, प्रा. सुप्रिया कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रिया बनसोडे या विद्यार्थिनीने केले. आभार इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. मंजुषा धुमाळ यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.