Hathras Case Update: योगी सरकारने हाथरस प्रकरणी सीबीआय चौकशीची केली शिफारस, पीडितेच्या वडिलांनी केली होती मागणी

एमपीसी न्यूज – हाथरस प्रकरणात उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. ती मान्य करून मुख्यमंत्र्यांनी अखेर सीबीआय चौकशीची शिफारस केली. 

“मुख्यमंत्री श्री योगी यांनी सीबीआयला संपूर्ण हाथरस प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.”, असे ट्वीट उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने केले आहे.

उत्तर प्रदेशचे डीजीपी आणि गृहसचिव अवनीश अवस्थी यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली होती आणि त्यांच्या तक्रारी आणि त्यांच्या मागण्या ऐकल्या आहेत. कुटुंबाची भेट घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर ठेवल्या, त्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी रात्री उशीरा सीबीआय चौकशीचे आदेश दिले. यापूर्वी यूपी सरकारने या प्रकरणाची एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, पोलिसांवर त्यांचा विश्वास नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

राहुल-प्रियंकाने पीडित कुटुंबाची भेट घेतली

विशेष म्हणजे, उत्तर प्रदेश सरकारचा हा आदेश त्याच वेळी आला जेव्हा काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडित कुटुंबाला भेटत होते. राहुल आणि प्रियंकाने पीडित कुटुंबाशी सुमारे एक तास संवाद साधला आणि त्यांचे दुःख जाणून घेतले.

या बैठकीनंतर राहुल गांधी म्हणाले, “आम्ही या पीडित कुटुंबासमवेत आहोत. सरकार त्यांना धमकावत आहे, त्यांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. यूपी सरकार सुरक्षा देण्यात अपयशी ठरत आहे. धमकावून त्यांच्या कागदांवर सह्या घेत ​​आहेत.”

पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या, “पीडित कुटुंबाला न्यायालयीन चौकशी हवी आहे. कुटुंबाला मुलीचा चेहरादेखील दिसू शकला नाही. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार आहे.”

डीजीपी आणि गृहसचिव यांनीही घेतली पीडितेच्या कुटुंबीयांची भेट 

उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक एच. सी. अवस्थी आणि गृह खात्याचे अतिरिक्त प्रधान सचिव अवनीश अवस्थी यांनी आज पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकार परिषदेत अवनीश अवस्थी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आम्ही पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटलो. ही अत्यंत वाईट घटना आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य त्यांचे वडील, भाऊ, धाकटा भाऊ, मेव्हणी, बहीण यांना भेटलो आणि त्यांच्याशी बोलला. आम्ही आश्वासन दिले आहे की, दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल. “

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.