IPL 2021 : आयपीएल मे बहोत मजा आ रहा है बॉस, so stay tune

एमपीसी न्यूज : (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) दोन्ही संघाची सलामीसह मधली फळी स्वस्तात बाद होते, एका टीमच्या कर्णधाराने तर दुसऱ्या टीमच्या डेव्हिड मिलर ने केलेली वादळी खेळी वांझोटी ठरते की काय अशी अवस्था येते आणि,त्यामुळेच निकालाचे होणारे दोलायमान पारडे

अशा अटीतटीच्या क्षणी स्पर्धेच्या इतिहासातल्या सर्वात महागड्या खेळाडूने  शेवटी शेवटी एकहाती फिरवलेले पारडे म्हणजे आजच्या आयपीएलच्या सातव्या सामन्याची खास वैशिष्ट्ये दोन यष्टीरक्षक कर्णधार ते ही तरुण यांच्यामधल्या आजच्या या लढाईकडे तमाम भारतीय क्रिकेटवेड्या रसिकांचे लक्ष लागून राहीले होते, त्यातल्या एकाने आपले नाणे अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय स्तरावर खणखणीतरित्या सिद्ध केले आहे,तर दुसरा अजूनही संधी मिळावी म्हणून धडपडतो आहे,

तरीही दोघांमध्ये  एक जबरदस्त साम्य आहे ते म्हणजे दोघेही असामान्य गुणवत्ता असलेले आहेत,आणि दोघांचे आंतरराष्ट्रीय करिअर सोनेरी आहे,खरे तर याचे श्रेय जाते आय पी एल लाच भारताचा सर्वोत्तम आणि सर्वात जास्त यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या सर्वोच्च फॉर्म मध्ये असताना इतरांना राष्ट्रीय संघात स्थान मिळवणे म्हणजे दिवा स्वप्नच वाटावे अशी अवस्था असताना ललित मोदीच्या डोक्यातून आलेल्या या स्पर्धेत अनेक नवोदित आणि उच्च गुणवत्ता असूनही राष्ट्रीय संघात अनेक कारणांमुळे स्थान मिळवू न शकलेल्या अनेकांसाठी आयपीएल म्हणजे जणू अलीबाबाची गुहाच होती,

तुमचा सर्वोत्कृष्ट खेळ करा आणि संधीचे सर्वार्थाने सोने करा असा मंत्र अनेकांना मिळाला आणि त्यातूनच काही हिरे थेट राष्ट्रीय संघात फक्त पोहचलेच नाही तर अल्पावधीतच संघाचे अविभाज्य भाग सुद्धा बनले,जसे बुमराह, जडेजा, पंड्या बंधू,अनेक नावे आहेत, पैसा, प्रसिद्धी सर्व काही आय पी एल मध्ये उत्तम खेळ करणाऱ्याला मिळाले,यातलेच दोन नावे म्हणजे दिल्ली चा नवोदित कर्णधार रिषभ पंत आणि राजस्थान रॉयलचा कर्णधार संजू सॅमसन आणि यांच्यात आज लढत होती आणि संजू ने नाणेफेक जिंकताच दिल्लीला फलंदाजी साठी आमंत्रित केले

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने आपल्या पहिल्याच सामन्यात चेन्नईला हरवून उत्तम सुरुवात केली होती तर राजस्थान रॉयल्स सुद्धा पहिल्या सामन्यांत जवळपास विजयाच्या भोजाजवळ आले होते,

पण 20/20 मध्ये काल काय घडले याला फारसे महत्व नसते, आज आपण कसे खेळतो यावर सर्व अवलंबून असते, मात्र यावेळी आत्मविश्वास पाठीशी असूनही दिल्ली संघाची सुरुवात फारच खराब झाली आणि पृथ्वी शॉ, शिखर धवन,अजिंक्य राहणे हे स्टार खेळाडू अगदी स्वस्तात जयदेव उनाडकटने गारद केले,अवघ्या 37  धावा आणि चार गडी बाद अशी धावसंख्या धावफलकावर दिसत होती

मात्र  फक्त भारतीय चाहतेच नाही तर जगभरातले चाहते ज्याच्या खेळाचे  रसिक आहेत त्या रिषभ पंत ने जणू हा धावफलक पाहिलाच  नाही अशा अविर्भावात सूत्रे हातात घेतली आणि आपल्या चिरपरिचित अंदाजात स्फोटक फलंदाजी सुरू केली आणि केवळ  32चेंडूतच नऊ चौकाराचे साहाय्याने आपले अर्धशतक सुद्धा पूर्ण केले मात्र त्याला दुसऱ्या बाजूने म्हणावी तशी साथ न मिळाल्याने दिल्ली संघाचा डाव निर्धारित 20 षटकात केवळ 147 धावा जमवू शकला,जयदेव उनाडकटने अतिशय कंजूष गोलंदाजी करताना चार षटकात केवळ 15 धावा देत सुरुवातीलच तीन बळी मिळवत दिल्ली कॅपिटलला सामन्यात बॅकफूटवर ढकलले

,त्याला मुस्तफिजूरने दोन तर ख्रिस वोक्स जो  या स्पर्धेतला सर्वात महागडा खेळाडू आहे, त्यानेही एक बळी मिळवत बर्यापैकी साथ दिली आणि दिल्ली संघाला केवळ 147 च धावा जमवता आल्या अर्थात या स्पर्धेत आत्तापर्यंतचे सर्वच सामने फार हाय स्कोरींग न झाल्याने  ही धावसंख्या अगदीच कमी होती असे मुळीच नव्हते आणि 20/20 चे वैशिष्ट्य हेच आहे

अगदी शेवटच्या चेंडु पर्यन्त सामना कोण जिंकेल हे सांगणे सोपे नसते अर्थात याला अपवाद नाहीच असे नसते पण मुळातच बेभरवशाचा आणि अनिश्चिततेच्या खेळात भाकीत करणे नक्कीच सोपे  नसते याची प्रचीती एका सेशन मध्येच नाही तर एका षटकात सुद्धा येते ज्याचे उदाहरण आपण काल अनुभवलेच होते की

जिंकण्यासाठी 148 धावांचे लक्ष डोळ्यापुढे ठेवून राजस्थान रॉयल ने फलंदाजी सुरू केली आणि दिल्ली संघाचाच कित्ता गिरवत आपल्या डावाची सुरुवात केली,

सलामीच्या वोहरा आणि जोस बटलर अगदी स्वस्तात बाद झाल्यानंतर पहिल्या सामन्यातला हिरो आणि कर्णधार संजू सॅमसन सुद्धा तंबूत परतला आणि पाठोपाठ शिवम दुबे अशी एकापेक्षा एक मोठी नाव असलेले खेळाडू तंबूत परतले आणि दिल्लीकर जितं मया च्या अविर्भावात नाचू लागली त्यांच्या याच अति आत्मविश्वासाला आधी डेव्हिड द किलर मिलर ने सुरूंग लावत  स्फोटक फलंदाजी सुरू केली आणि नवख्या  कर्णधाराला काय करावे तेच सुचेना तो गडबडला आणि गडबडला आणि याचाच फायदा घेत मिलरने बघताबघता सामना राजस्थान रॉयल कडे झुकवायला सुरुवात केली

त्याला तेवातियाने सुद्धा महत्वाची साथ दिली पण 62 धावा करून मिलर बाद  झाला आणि पाठोपाठ राहुल तेवातीया सुद्धा,आणि पुन्हा एकदा आणि अनिश्चित खेळात विजयाचे पारडे राजस्थान कडून दिल्ली कडे झुकले असे वाटत असतानाच ख्रिस मॉरिस ने अंगात वारे शिरल्यासारखी धुंव्वाधार खेळी केली आणि चार गगनचुंबी षटकार मारत सामना शब्दशः दिल्लीच्या घशातला घास बाहेर काढावा तसा हिसकावून राजस्थान रॉयल्सचे विजयाचे खाते उघडून दिले आणि आपल्याला एवढी विक्रमी किंमत का मिळाली हे सप्रमाण सिद्ध केले याच गडबडीत रिषभ पंतने मॉरिसला धावबाद करण्याची सोपी संधी गमावली आणि त्याचाच फटका सोसत हातात आलेली विजयाची संधी  सुद्धा गमावली

या विजयाने  सतत दोलायमान होणाऱ्या पारड्याने इथे तरी भाकीत करू नका आणि सामना संपेपर्यंत काहीही निष्कर्ष लावू नका असा सल्ला दिलाय ,बरोबर ना? अतिशय ऊत्तम गोलंदाजी करून तीन बळी घेणाऱ्या जयदेव उनाडकटने ऐन मोक्याच्या क्षणी ख्रिस मॉरिस ला शेवटपर्यंत साथ देत महत्वपूर्ण अकरा धावा केल्या ज्या त्याला सामनावीर करून गेल्या

आय पी एल मे बहोत मजा आ रहा है बॉस, so stay tune

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.