Pune News : ‘त्या’ तोतया पोलिस उपनिरीक्षकाचे अखेर फुटले बिंग

एमपीसी न्यूज : राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचा विजेता असल्याचे बनावट सर्टिफिकेट सादर करून पोलीस दलात  पोलिस उपनिरीक्षक पदावर नोकरी मिळवून शासनाची फसवणूक करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महादेव अशोक सकपाळ (रा. मधुराज गणेश सोसायटी, शिवाजीनगर, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. उपक्रीडा संचालक प्रमोदिनी अरुण अमृतवाड (वय 57) यांनी याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, महादेव सकपाळ याने कोईमतूर (तामिळनाडू) येथे 2010 साली झालेल्या वरिष्ठ चॅम्पियन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भाग घेऊन द्वितीय क्रमांक पटकवल्याचे खोटे व बनावट प्रमाणपत्र करून 2017 साली क्रीडा कोट्यामधून पोलीस उपनिरीक्षक पदावर नोकरी मिळवली होती.

दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले होते. कोर्टाने फिर्यादी यांच्या कार्यालयाला आरोपीचे म्हणणे ऐकून घेऊन कारणे दाखवा नोटीस बजावून पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कारवाई पूर्ण झाल्यानंतर फिर्यादीने तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.