Lonavala : घंटागाडी व कचराडेपोवर कचरा वेचकांना राख्या बांधत त्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

एमपीसी न्यूज – घंटागाडी व कचरा डेपो येथे कचरा गोळा करण्याचे काम करणार्‍या कामगारांना राख्या बांधत आँक्झिलियम काँन्व्हेंटच्या मुलींनी खर्‍या अर्थाने सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. कचरा गोळा करत शहराला स्वच्छ व सुंदर ठेवणारे स्वच्छता दूत हेच आमच्या शहरातील खरे हिरो आहेत, असे म्हणत या मुलींनी कचरावेचक कामगारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

बहीण भावाच्या पवित्र नाते संबंधांचे व प्रेमाचे प्रतिक असलेला रक्षाबंधनाचा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सणाचे औचित्य साधत आज लोणावळ्यातील आँक्झिलियम काँन्व्हेंट या मुलींच्या शाळेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत घंटागाडीवर काम करणारे कामगार तसेच कचरा डेपोवरील कचरावेचक यांना राख्या बांधत हा सण उत्साहात साजर केला. या अनोख्या रक्षाबंधनाने भारावून गेलेल्या कर्मचार्‍यांनी शाळेकरिता भेट म्हणून एक घड्याळ दिले तर मुलींनी बिस्किट वाटप केले.

लोणावळा शहराच्या स्वच्छता मोहिमेत आँक्झिलियम शाळेच्या मुलींनी कायम भरघोस कार्य केले आहे. कचरा गोळा करणारे कामगार दिवसरात्र स्वच्छतेचे काम करत असल्याने आज खरं तर आपले लोणावळा शहर स्वच्छ व सुंदर झाले असल्याने आमच्या दृष्टीने तेच खरे हिरो असल्याची भावना यावेळी शाळकरी मुलींनी व्यक्त केली. यावेळी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने मुलींनी

कचरा डेपो दाखवत त्याठिकाणी कचर्‍यापासून तयार करण्यात येणारा बायोगॅस व खत निर्मिती प्रकल्प दाखवत माहिती देण्यात आली. मुख्याधिकारी सचिन पवार यांनी कचरा डेपोवर करण्यात आलेल्या उपाययोजना व कचरा विलगीकरण याची माहिती मुलींना दिली.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेविका आरोही तळेगावकर, सुर्वणा अकोलकर, मंदा सोनवणे, रचना सिनकर, जयश्री आहेर यांनी कचराडेपोवर भेट देत मुलींनी स्वंस्फुर्तीने राबविलेल्या या रक्षाबंधन सामाजिक बांधिलकी उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी जाधव यांनी मुलींना कचरा घंटागाडीत वर्गीकरण करुन का द्यावे याचे महत्व पटवून दिले. येणार्‍या काळात स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नगरपरिषदेच्या सोबत काम करत शहरातील स्वच्छतेची ज्योत काम तेवत ठेवण्याचा संकल्प यावेळी आँक्झिलियमच्या शिक्षिकांनी व्यक्त केला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.